महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १४ सप्टेंबर – पुणे – जवळपास महिनाभरापासून जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्याने त्याचा फायदा ग्राहकांना देण्याची तयारी पेट्रोलियम कंपन्यांनी दर्शवली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी मागील तीन दिवसांत दुसऱ्यांदा इंधन दरात कपात केली आहे. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज पेट्रोल १४ पैसे आणि डिझेल १५ पैशांनी स्वस्त झाले आहे.
मुंबईत सोमवारी पेट्रोल दर प्रती लीटर ८८.२८ रुपये आहे. तर डिझेल ७९.२९ रुपये झाले आहे. शनिवारी केलेल्या दर कपातीने मुंबईत पेट्रोलचा भाव प्रती लीटर ८८.५१ रुपये आणि डिझेलचा भाव ७९.४५ रुपये झाला होता. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.७२ रुपये असून डिझेलचा भाव ७२.७८ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.७७ रुपये असून डिझेल ७८.२८ रुपये झाला आहे. कोलकात्यात पेट्रोल ८३.२३ रुपये आहे. डिझेल ७६.२८ रुपये प्रती लीटर झाला आहे.जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव ४० डॉलर प्रती बॅरलच्या आसपास आहे.
देशात पेट्रोल आणि डिझेल नियंत्रणमुक्त आहेत. २०१० मध्ये सरकारने पेट्रोल नियंत्रणमुक्त केले होते. तर २०१४ मध्ये डिझेल दर नियंत्रणमुक्त करण्यात आले. देशात इंधन दर जागतिक बाजाराशी संलग्न करण्यात आले आहेत. दररोज सकाळी सहा वाजता कंपन्यांकडून इंधन दर आढावा घेतला जातो. १६ मार्चपासून पेट्रोलियम कंपन्यांनी ८३ दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले होते