लाडकी बहीण, केवायसी आणि सरकारची ‘तपासणी बहादुरी’: आदिती तटकरे यांची पोस्ट नेमकी काय?

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. २१ जानेवारी | महाराष्ट्र सरकारने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरू केली, तेव्हा राज्यातील महिलांना वाटलं—“चला, आता सरकार आपल्याला खरंच बहीण मानतंय.” दरमहा पंधराशे रुपये खात्यात येऊ लागले आणि अनेक घरांमध्ये महिन्याच्या शेवटी उरलेली शंभर-दोनशे रुपयांची चिंता थोडीफार निवळली. पण सरकारचा स्वभाव जुना—देण्याआधी घोषणा आणि देऊन झाल्यावर अडथळे! मध्येच e-KYC नावाचा असा काही प्रकार आला की बऱ्याच लाडक्या बहिणींनी ‘चुकीचा पर्याय’ निवडला आणि बँक खात्यातील पंधराशे रुपयांनी अचानक अघोषित संन्यास घेतला. बहीण म्हणवून घेतलं, पण नंतर “आधी ओळखपत्र दाखवा, मगच रक्कम” असा कारभार सुरू झाला. सरकारी यंत्रणेची गंमत अशी की चूक कुणाचीही असो, शिक्षा मात्र लाभार्थीलाच!

या गोंधळाचा फटका वाशिमसारख्या जिल्ह्यांत जास्त बसला. हप्ता बंद झाला, महिलांनी विचारलं—“आमचं काय चुकलं?” उत्तर मिळालं—“सिस्टम.” मग संतापाचा उद्रेक झाला. जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांची गर्दी झाली, पण साहेब भेटायला तयार नाहीत. शेवटी सरकारी वाहनालाच घेराव घातला गेला—कारण लोकशाहीत माणूस ऐकला जात नसेल, तर निदान गाडी तरी अडवता येते! या सगळ्या गदारोळात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची पोस्ट आली आणि सरकारला अचानक आठवण झाली की “अरे हो, या महिलाच तर आपल्या योजना आहेत!” पोस्टमध्ये सांगण्यात आलं—e-KYC करताना चूक झाली असेल तर काळजी करू नका, आता अंगणवाडी सेविका प्रत्यक्ष पडताळणी करतील. म्हणजे आधी ऑनलाइन चूक, मग ऑफलाइन तपासणी—सरकारी संतुलन राखलं गेलं!

खरं सांगायचं तर ही पोस्ट म्हणजे सरकारची डॅमेज कंट्रोल प्रेस नोट आहे. कारण योजना बंद पडली तर मतंही बंद पडतात, हे सरकारला चांगलंच ठाऊक आहे. ‘लाडकी बहीण’ योजना ही केवळ आर्थिक मदतीची योजना नाही, तर राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील योजना आहे. त्यामुळे “तुम्ही चुकलात” असं सरळ न सांगता “तपासणी करू” असं सांगण्यात आलं. अंगणवाडी सेविकांवर पुन्हा एक नवी जबाबदारी आली आणि प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला. मात्र प्रश्न उरतोच—सरकारने योजना आखताना जर प्रणाली नीट केली असती, तर आज ही वेळ आली असती का? लाडकी बहीण ही फक्त पोस्टमध्ये नाही, तर प्रत्यक्ष खात्यातही दिसायला हवी. कारण बहीण जर खरंच लाडकी असेल, तर तिला रांगेत उभं राहायला लावून “तू खरी आहेस का?” असा सवाल विचारायची वेळच येऊ नये!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *