![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. २५ जानेवारी | सिंहस्थ आला की सरकारला अचानक साक्षात्कार होतो—रस्ते आठवतात, देव आठवतात, पर्यटन आठवतं आणि रोजगार तर खास आठवतो! नाशिक-त्र्यंबकेश्वर-शिर्डी-सप्तशृंगगड-शनिशिंगणापूर असा भव्यदिव्य धार्मिक कॉरिडॉर उभारायचा निर्णय म्हणजे सरकारने उत्तर महाराष्ट्राच्या कपाळावर “आता तरी विकास” अशी गंधरेषा ओढली आहे. भाविक येणार, दर्शन घेणार, प्रसाद खाणार, फोटो काढणार आणि अर्थव्यवस्थेला ‘मोक्ष’ मिळणार—असा हा सर्वसमावेशक प्लॅन आहे. सिंहस्थाच्या निमित्ताने जे काही होणार आहे ते वर्षानुवर्षे व्हायला हवं होतं, पण “मुहूर्त” लागत होता, तो आता लागला! दर्जेदार रस्ते, सुविधा, स्वच्छता—हे शब्द सरकारी कागदावर फार देखणे दिसतात. प्रत्यक्षात ते जमिनीवर उतरले, तर भाविकांनाही आनंद आणि प्रशासनालाही पुण्य लाभेल, यात शंका नाही.
या कॉरिडॉरचा दुसरा गोड प्रसाद म्हणजे रोजगार. “नोकरी नाही” असं म्हणणाऱ्यांना आता देवदर्शनासोबत कामधंदाही मिळणार आहे. पर्यटन, कृषी पर्यटन, होम-स्टे, गाइड, टूर ऑपरेटर—हे सगळे इंग्रजी शब्द ग्रामीण भागात रुजवण्याचा सरकारचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. विशेष म्हणजे ‘आई’ उपक्रमातून महिलांना उद्योगाच्या संधी दिल्या जात आहेत. पूर्वी आई स्वयंपाकघरात, आता आई पर्यटनात—हा बदल केवळ घोषणेत न राहता वास्तवात उतरला, तर सामाजिक परिवर्तनाचा सिंहस्थच होईल. नाशिकची द्राक्षं, वाइन आणि शेततळ्यांच्या काठावरचं पर्यटन जर भाविकांच्या पावलांशी जोडलं गेलं, तर शेतकऱ्याचंही भाग्य उजळेल. देव, द्राक्ष आणि विकास—असं त्रिकूट क्वचितच जुळतं!
भीमाशंकर, घृष्णेश्वर आणि त्र्यंबकेश्वर या तीन ज्योतिर्लिंगांना जोडण्याचा विचार म्हणजे अध्यात्मिक ‘सुपर एक्सप्रेस’च! त्यासाठी हजारो कोटींचा निधी, जीर्णोद्धार, सुविधा—हे ऐकायला भारी आहे. मात्र , “घोषणांचा गजर कमी आणि कामाचा आवाज जास्त झाला पाहिजे.” कारण भाविक देवाकडे श्रद्धेने पाहतो, पण रस्त्याकडे डोळे उघडे ठेवून! सिंहस्थाच्या निमित्ताने उत्तर महाराष्ट्राचा पर्यटन चेहरा बदलणार असेल, तर हा बदल पोस्टरपुरता न राहता प्रत्यक्ष अनुभवात दिसायला हवा. नाहीतर पुढच्या सिंहस्थात पुन्हा नवं शीर्षक येईल—“यावेळी मात्र नक्की!”
