![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. २५ जानेवारी |आठवड्याचा शेवट गोड झाला म्हणे—पण तो गोडपणा कुणासाठी? सोनं खरेदी करणाऱ्यासाठी की चांदी साठवणाऱ्यासाठी? कारण या आठवड्यात सोनं अक्षरशः रुसून बसलं आणि तब्बल दहा हजारांनी खाली आलं, तर चांदीने मात्र “मला कोण थांबवणार?” असा सवाल करत थेट तीन लाख पन्नास हजारांचा टप्पा गाठला! कालपर्यंत सोन्याच्या दुकानात मान ताठ करून उभा असलेला ग्राहक आज किंमत पाहून म्हणतोय, “थांबूया थोडं,” आणि चांदीकडे पाहणारा म्हणतोय, “आता परवडतच नाही!” बाजारातली ही किमया म्हणजे आर्थिक शास्त्र नव्हे, तर निव्वळ मानसिक खेळ आहे. कारण काल जी चांदी दोन लाखांवर होती, ती आज तीन-सव्वातीन लाखांवर गेली; आणि सोनं जे ‘सुरक्षित गुंतवणूक’ म्हणून ओळखलं जातं, तेच आज भावनेच्या घसरणीने घसरलं!
गेल्या महिनाभरात सोनं-चांदीने असा काही भावनात्मक डोलारा घेतलाय की सामान्य माणूस कॅल्क्युलेटर, मोबाईल आणि ज्योतिष—तिन्ही एकाच वेळी वापरतोय. चांदी दर आठवड्याला पंधरा-पंधरा हजारांनी उडी मारतेय, जणू तिला कुठेतरी लग्न ठरलंय! अवघ्या सात दिवसांत चांदीच्या भावात पंचावन्न हजारांची वाढ—ही आकडेवारी पाहिली की वाटतं, चांदी आता धातू नसून ‘स्टेटस सिंबॉल’ झाली आहे. दुसरीकडे सोनं दहा हजारांनी पडताच बाजारात आनंद नाही, उलट संभ्रम आहे. कारण जेव्हा सोनं वाढतं तेव्हा “घ्या घ्या” म्हणतात, आणि पडतं तेव्हा “थांबा थांबा” म्हणतात—मग घ्यायचं कधी? “सोनं गरीबाचं स्वप्न आहे आणि श्रीमंतांचा खेळ!” चांदी मात्र आता दोघांनाही घाम फोडतेय.
या सगळ्यात खरी गंमत म्हणजे ‘जीएसटी’. सोनं-चांदीचे भाव ऐकताना आधी हृदयाचे ठोके वाढतात आणि नंतर “जीएसटीसह” हा शब्द ऐकला की थेट बीपी! सोनं विना जीएसटी स्वस्त वाटतं, पण बिल हातात आलं की लक्षात येतं—देव दर्शन मोफत, पण दागिन्याचं नाही. चांदी तीन लाख पन्नास हजारांवर पोहोचली म्हणजे आता ती तिजोरीत नव्हे, तर स्वप्नातच ठेवावी लागणार! बाजार सांगतोय—आज सोनं घ्या, उद्या चांदी घ्या, परवा काहीच घेऊ नका. पण सामान्य माणूस म्हणतोय—“भाव काहीही असो, माझं बजेट मात्र स्थिर आहे!” म्हणूनच या आठवड्याचा शेवट गोड झाला असला, तरी तो गोडवा चांदीच्या चमच्याने नाही, तर केवळ बातमीतच चाखता येतो!
