Pune News: पुण्याचे रस्ते की मृत्यूचे महामार्ग? हेल्मेट घाला, डोळे उघडे ठेवा… तरीही श्वासाची खात्री नाही!

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. २५ जानेवारी | पुणे हे विद्येचं माहेरघर, संस्कृतीची राजधानी आणि सध्या—मृत्यूला निमंत्रण देणारे शहर! कारण इथे रस्त्यावर उतरला की आधी देव आठवतो, मग घरच्यांचा चेहरा डोळ्यांसमोर येतो आणि शेवटी प्रश्न पडतो—“आज घरी पोहोचू का?” मागील वर्षभरात २९० नागरिक रस्ते अपघातात मरण पावले, त्यात ९० टक्के दुचाकीस्वार आणि पादचारी! म्हणजे ज्यांच्याकडे ना लोखंडी कवच, ना एअरबॅग—तेच सर्वाधिक असुरक्षित. पुण्याचे रस्ते इतके प्रगत झाले आहेत की ते माणसाची परीक्षा घेतात—वेगाची नाही, नशिबाची! सिग्नल आहे पण पाळायचा नाही, झेब्रा क्रॉसिंग आहे पण वापरायचा नाही आणि पदपथ आहे… पण तो कुणासाठी, हे कुणालाच ठाऊक नाही.

आकडेवारी वाचली की अंगावर काटा येतो. २०१९ ते २०२५ या सहा वर्षांत तब्बल १९०० मृत्यू! ही संख्या एखाद्या लहान गावाइतकी आहे. विशेष म्हणजे २० ते ४९ वयोगटातील पुरुष सर्वाधिक बळी—म्हणजे घराचा कर्ता, कमावता हात, संसाराचा कणा थेट रस्त्यावर मोडतोय. महिलांमध्ये ६० वर्षांवरील ज्येष्ठ महिला सर्वाधिक धोक्यात—कारण त्यांच्यासाठी रस्ता ओलांडणं हे ‘अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट’ बनलं आहे. रात्री आठ ते पहाटे तीन हा काळ म्हणजे अपघातांचा ‘शुभमुहूर्त’! त्यात शुक्रवार-शनिवार आला की पुण्याचे रस्ते दारू, वेग आणि बेदरकारपणाचा कॉकटेल होतात. , “पुण्यात माणूस अपघातात मरत नाही; तो व्यवस्थेच्या निष्काळजीपणामुळे ठार मारला जातो.”

सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे ५४ टक्के अपघात ‘हिट अँड रन’ प्रकारातले. म्हणजे गाडी धडकते, माणूस पडतो आणि चालक पळतो—ही कसली संस्कृती? पुणे-सोलापूर, पुणे-अहिल्यानगर महामार्ग आणि बाह्यवळण रस्ता हे मृत्यूचे कायमस्वरूपी पत्ते झाले आहेत. वेगमर्यादा कागदावर, पोलिस शिफारशी फाईलमध्ये आणि अंमलबजावणी देवावर सोडलेली! हेल्मेट सक्ती आहे, पण रस्ते सुरक्षित नाहीत; नियम आहेत, पण त्यांची भीती नाही. प्रश्न साधा आहे—अपघात कमी करायचे की फक्त आकडे मोजायचे? पुणे जर खरंच ‘स्मार्ट सिटी’ असेल, तर आधी माणूस सुरक्षित राहील अशी सिटी करा. नाहीतर उद्याची बातमी आजच तयार आहे—“आजही काही जण घरी पोहोचले नाहीत!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *