Pune Mumbai Expressway: एक टँकर, एक लेन… आणि हजारो नागरिकांचा अंतहीन ‘प्रवास’!

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. ४ फेब्रुवारी २०२६ | मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाचा एक्सप्रेस पास! पण मंगळवारी मध्यरात्री या पासला थेट ‘पॉज’ बटण लागलं. आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन गॅसचा टँकर पलटी झाला आणि महामार्ग क्षणार्धात पार्किंग लॉटमध्ये बदलला. गॅस गळती, धोक्याची घंटा, आणि प्रशासनाची सावध पावलं— हे सगळं ठीक. पण सावधगिरीच्या नावाखाली तब्बल आठ-दहा तास वाहतूक ठप्प? अखेर मध्यरात्री ‘धोका टळला’ असं जाहीर करून एक लेन सुरू करण्यात आली. एक लेन! म्हणजे जणू हजारो वाहनांना सांगितलं, “हळूच, शांतपणे, एकेकाने दुःख मिरवत जा.” एक्सप्रेसवेवर एक्सप्रेस कुठेच दिसत नव्हता; फक्त संयमाची परीक्षा सुरू होती.

या महामार्गावर अडकलेल्यांसाठी वेळ थांबला होता, पण अडचणी मात्र धावत होत्या. कुणाची फ्लाइट चुकली, कुणाची महत्त्वाची मीटिंग मातीमोल झाली, तर कुणी पहाटे चार वाजल्यापासून ‘इंजिन बंद–नशीब चालू’ या अवस्थेत बसून होता. काही कॅन्सरग्रस्त रुग्ण अडकले, हे ऐकून तर रस्ता नव्हे, तर व्यवस्था पलटी झाली आहे असंच वाटलं. पाणी नाही, अन्न नाही, शौचालय नाही— पण टोल मात्र वेळेवर घेतला जातो! प्रवाशांचा सवाल रास्त आहे: “आपत्ती आली की महामार्ग बंद, पण आमचं आयुष्य बंद पडल्याची जबाबदारी कोणाची?” गॅस टँकर पलटी होणं अपघात असेल, पण व्यवस्थेची गती कासवाची का? एक्सप्रेसवेवर ‘आपत्कालीन यंत्रणा’ नावाची गोष्ट फक्त फाईलमध्येच आहे का?

खरं तर हा प्रश्न एका टँकरपुरता मर्यादित नाही. हा आरसा आहे— व्यवस्थेचा, नियोजनाचा आणि प्राधान्यांचा. दररोज कोट्यवधींचा टोल जमा होतो, पण आपत्कालीन परिस्थितीत पर्यायी मार्ग, जलद प्रतिसाद पथक, प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा यांची सोय का नसते? गॅस गळती थांबवायला वेळ लागतो, हे मान्य. पण त्या वेळेत माणसांना दिलासा देण्याची जबाबदारी कुणाची? महामार्ग हा फक्त गाड्यांचा नसतो; तो माणसांचा असतो. आज एक लेन सुरू झाली, उद्या पूर्ण मार्ग खुला होईलही. पण प्रश्न उरतोच— पुढच्या वेळी पुन्हा असंच होणार का? की हा धडा लक्षात ठेवून ‘एक्सप्रेस’ शब्दाला खराखुरा अर्थ दिला जाणार? नाहीतर महाराष्ट्राच्या प्रगतीचा हा महामार्ग, लोकांच्या संयमाचीच कसोटी पाहत राहील!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *