याला म्हणतात नशीब ! ३०० रुपयांची खोड… आणि ६३४ कोटींचा चमत्कार!

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. १३ फेब्रुवारी २०२६ || याला नशीब म्हणावं की दूरदृष्टी, की काळाची अफलातून थट्टा—हे ठरवणं तसं अवघडच आहे. कारण ज्या वयात बहुतांश मुले वही हरवते म्हणून रडत असतात, त्या वयात मलेशियातील अर्स्यान इस्माईल नावाचा एक मुलगा इंटरनेटवर डोमेन खरेदी करत होता. वय अवघं दहा वर्षं, खिशात स्वतःचे पैसे नाहीत, पण डोक्यात एक खोडकर कल्पना. १९९३ साली आईच्या क्रेडिट कार्डचा वापर करून त्यांनी AI.com हे डोमेन अवघ्या ३०० रुपयांना विकत घेतलं. कारण काय? त्यांच्या नावाची आद्याक्षरं ‘AI’ होती. एवढंच. त्या वेळी ना ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ची चर्चा, ना टेक्नॉलॉजीचा गजर. पण काळाने पलटी मारली आणि तीन दशकांनंतर हीच खोड त्यांना थेट अब्जाधीशांच्या रांगेत घेऊन गेली.

१९९३ ते २०२० या काळात AI.com हे डोमेन जवळपास निष्क्रियच होतं. ना मोठा व्यवसाय, ना गाजावाजा. डिजिटल जगात ते एक शांत, दुर्लक्षित नाव होतं. मात्र जसजशी कृत्रिम बुद्धिमत्तेची चर्चा वाढू लागली, तसतशी ‘AI’ ही दोन अक्षरं सोन्याहून महाग झाली. टेक कंपन्या, स्टार्टअप्स आणि गुंतवणूकदार ‘AI’ नाव असलेल्या डोमेनच्या मागे लागले. डिजिटल रिअल इस्टेटमध्ये एआयवर आधारित डोमेन म्हणजे प्रतिष्ठेचं आणि विश्वासार्हतेचं प्रतीक बनलं. अशा वेळी AI.com सारखं साधं, थेट आणि जागतिक पातळीवर ओळख निर्माण करणारं डोमेन म्हणजे अक्षरशः खजिनाच. अखेर एप्रिल २०२५ मध्ये हे डोमेन क्रिप्टो डॉट कॉमचे सीईओ क्रिस मार्झालेक यांना तब्बल ७० दशलक्ष डॉलर्सना विकण्यात आलं—भारतीय चलनात तब्बल ६३४ कोटी रुपये. हा आतापर्यंत उघड झालेल्या डोमेन व्यवहारांपैकी एक मोठा करार ठरला.

विशेष म्हणजे, या व्यवहारापूर्वी इस्माईल यांना १०० दशलक्ष डॉलर्सपर्यंतच्या ऑफर मिळाल्या होत्या. तरीही त्यांनी ७० दशलक्ष डॉलर्सवर शिक्कामोर्तब केला. काहींना हा निर्णय चुकीचा वाटतो, तर काहींना तो परिपक्व. यंदाच्या सुपर बाउलदरम्यान क्रिप्टो डॉट कॉमने AI.com च्या बॅनरखाली ‘एजेंटिक AI’ प्लॅटफॉर्म सुरू केल्यावर हे डोमेन पुन्हा चर्चेत आलं. स्टॉक ट्रेंडिंग, मेसेजिंग आणि ॲप-आधारित कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या या प्लॅटफॉर्ममुळे AI.com नावाला नवी ओळख मिळाली. सोशल मीडियावर मात्र एकच चर्चा सुरू आहे—हे नशीब होतं, की दूरदृष्टी? कारण ३०० रुपयांना डोमेन घेणं जितकं सोपं होतं, तितकंच ते ३० वर्षं जपून ठेवणंही सोपं नव्हतं. कधी कधी इतिहास घडवण्यासाठी मोठी योजना नाही, तर लहानपणी केलेली एक खोड पुरेशी ठरते, याचं हे जिवंत उदाहरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *