![]()
महाराष्ट्र 24 : ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी- दिनांक 13- पिंपरी-चिंचवड शहरात विकासकामांचा गजर होत असताना नागरिक मात्र मूलभूत सुविधांसाठी हेलपाटे मारताना दिसत आहेत. निगडी ते पिंपरी दरम्यान महामेट्रो च्या कामामुळे रस्ते अरुंद झाले असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. विशेषतः चिंचवड स्टेशन येथील पेट्रोल पंप ते एम्पायर इस्टेट हा मार्ग तर जीवघेणा बनला आहे. वाहनचालकांना रोज अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. वाहतूक नियंत्रणासाठी मनुष्यबळ नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मल्हार आर्मीचे शहराध्यक्ष श्री. दिपक ज्ञानदेव भोजने यांनी महापौर रवि लांडगे यांना निवेदन देत तात्काळ दुरुस्ती, खड्डे बुजविणे व वाहतूक व्यवस्थेची मागणी केली आहे.
रस्त्यांच्या प्रश्नाबरोबरच शहरातील पाणीपुरवठ्याचाही गंभीर मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. सध्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मार्फत एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. एखाद्या दिवशी पाईपलाईन फुटली किंवा जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल कामांमुळे पाणी कमी दाबाने येते. परिणामी अनेक सोसायट्यांच्या टाक्या भरत नाहीत आणि टँकरचा आधार घ्यावा लागतो. बैठ्या घरांत व चाळीत राहणाऱ्या कुटुंबांची अवस्था अधिक बिकट आहे. टँकर परवडत नसल्याने त्यांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. निवडणुकीच्या काळात २४x७ पाणीपुरवठ्याचे आश्वासन देणाऱ्यांनी किमान दररोज पूर्ण दाबाने पाणी द्यावे, अशी ठाम मागणी दीपक भोजने यांनी केली आहे.
“विकास हवा, पण तो नागरिकांच्या जिवावर नको,” असा स्पष्ट संदेश या निवेदनातून देण्यात आला आहे. रस्त्यांचे प्रश्न असोत किंवा पाण्याची टंचाई—प्रशासनाने विभागांतील समन्वय साधून तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागरिकांचा रोष वाढेल, असा इशाराही देण्यात आला आहे. शहराचा विकास फलकांवर नव्हे, तर नागरिकांच्या रोजच्या जीवनात दिसला पाहिजे; हीच पिंपरी-चिंचवडकरांची अपेक्षा आहे.
