RTE Admission : ‘आरटीई’ कोट्याचा लाभ घरापासून १ किमी परिसरातील शाळांतच… शिक्षण विभागाचा नवा निर्णय…

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. १४ फेब्रुवारी २०२६ || शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेच्या सुधारित कार्यपद्धतीनुसार, ऑनलाइन अर्ज करताना पालकांना त्यांनी नोंदविलेल्या निवासस्थानाच्या एक किलोमीटर परिसरातील शाळाच दिसणार आहेत. त्याचप्रमाणे, प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरतानाच आवश्यक कागदपत्रे जोडावी लागणार आहेत.

शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. ‘आरटीई’च्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत कालानुरूप सुधारणा करण्यासाठी, तसेच नवीन नियम, आवश्यक बाबींचा समावेश करून शासनाला शिफारस करण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली २९ जानेवारी २०२५ रोजी समिती नियुक्त करण्यात आली होती. त्यावर नागरिकांचे अभिप्रायही विचारात घेण्यात आले. त्यानंतर समितीच्या शिफारशींनुसार आरटीई २५ टक्के प्रवेशासाठीची सुधारित कार्यपद्धती निश्चित करण्यात आली.

आतापर्यंत पालकांना ऑनलाइन अर्ज करताना शाळा निवडण्याची, कागदपत्रे प्रवेशावेळी सादर करण्याची मुभा होती. मात्र, सुधारित कार्यपद्धतीनुसार, प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करताना कमाल १० शाळांचे पर्याय देता येतील. त्यासाठी संकेतस्थळावर विद्यार्थ्याच्या नोंदविलेल्या निवासस्थानापासून एक किलोमीटर परिसरातीलच शाळा दर्शवल्या जातील. ऑनलाइन सोडत काढताना एक किलोमीटर आणि त्यापेक्षा कमी अंतरावरील शाळांसाठी २५ टक्क्यांतर्गत एका शाळेत उपलब्ध असलेल्या प्रवेशाच्या रिक्त जागांपेक्षा जास्त पालकांकडून अर्ज प्राप्त झाल्यास प्रवेशाच्या पहिल्या फेरीतच त्या शाळेची सोडत प्रक्रिया पूर्ण होईल. सोडतीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एकाच शाळेचे वाटप होईल.

प्रवेशासाठी अर्ज भरतानाच आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. प्रवेशावेळी पालकांनी दाखविलेला पत्ता आणि ‘आधार’ ओळखपत्रावरील पत्ता एकच असल्याची तपासणी करावी. पत्ताबदल दिसल्यास प्रत्यक्ष तपासणी करावी. शाळेने विद्यार्थ्याला प्रवेश दिल्यास किंवा प्रवेश नाकारल्यास त्याबाबतची पावती पालकांना द्यावी. त्याबाबत शासनाला दिसण्याची व्यवस्था प्रणालीमध्ये असावी, अशा सूचना आहेत.

शाळांनी प्रवेश नाकारल्यास पालकांना ऑनलाइन तक्रार दाखल करता येईल. प्रवेश नाकारणाऱ्या शाळांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार गटशिक्षणाधिकारी, क्षेत्रीय अधिकारी यांना असतील. प्रवेशावेळी विद्यार्थ्याचे आधार कार्ड नसल्यास ते काढून घेण्याची जबाबदारी शाळा, पालकांची राहील. विद्यार्थ्याच्या आधार कार्डवरील तपशील शाळेने आरटीई संकेतस्थळ, सरल प्रणालीत नोंदवणे आवश्यक आहे. शुल्क प्रतिपूर्ती झाल्याचा लघुसंदेश (एसमएमएस) पालकांना पाठवला जाणे, शाळेच्या शुल्काचा तपशील नोंदवण्याची सुविधा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *