Pune Bangkok flight: पुणे–बँकॉक उड्डाणाला अचानक ‘ब्रेक’; उन्हाळी हंगामात इंडिगोची माघार, प्रवाशांपुढे प्रश्नचिन्ह

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २३ फेब्रुवारी २०२६ | पुणे : आंतरराष्ट्रीय नकाशावर झेपावण्याची स्वप्ने पाहणाऱ्या पुणे विमानतळाला उन्हाळ्याच्या उंबरठ्यावरच धक्का बसला आहे. IndiGo या खासगी विमान कंपनीने पुणे–बँकॉक मार्गावरील आपली सेवा २९ मार्चपासून सुरू होणाऱ्या उन्हाळी हंगामात रद्द केली आहे. हिवाळी हंगामात विविध कारणांनी काही आंतरराष्ट्रीय सेक्टर बंद केल्यानंतर आता पुणे–बँकॉक उड्डाणालाही ‘ब्रेक’ लागला आहे. विशेष म्हणजे, या निर्णयामागे कोणतेही ठोस कारण कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. “कामकाजातील बदल” एवढ्याच एका ओळीत हा निर्णय गुंडाळण्यात आल्याने प्रवासी आणि पर्यटन व्यावसायिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

या मार्गावरून आता फक्त Air India Express ची सेवा उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे स्पर्धा कमी होऊन प्रवाशांसाठी पर्यायही मर्यादित झाले आहेत. हवाई वाहतूक तज्ज्ञांच्या मते, कमी प्रतिसाद आणि व्यावसायिक व्यवहार्यता हा या निर्णयामागील संभाव्य घटक असू शकतो. एखाद्या मार्गावर अपेक्षित ‘लोड फॅक्टर’ मिळाला नाही, तर कंपन्या तात्पुरती माघार घेतात किंवा विमान इतर लाभदायक सेक्टरकडे वळवतात. पुणे–बँकॉक मार्गावर सातत्याने अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची चर्चा क्षेत्रात आहे. परिणामी, कंपनीने उन्हाळी स्लॉट्स इतर मार्गांसाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेतल्याची शक्यता वर्तवली जाते.

दरम्यान, पुणे विमानतळावरून दुबई, बँकॉक आणि अबुधाबी या आंतरराष्ट्रीय गंतव्यांसाठी सेवा सुरू असली तरी एका मार्गावर एकाच कंपनीची मक्तेदारी राहिल्यास तिकिटांच्या दरांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नव्या टर्मिनलनंतर आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी वाढेल, अशी अपेक्षा होती; मात्र चालू असलेली सेवा बंद होणे हा विस्ताराच्या दृष्टीने प्रतिकूल संकेत मानला जातो. विमान कंपन्या दर हंगामानुसार स्लॉट्स, खर्च आणि प्रवाशांचा प्रतिसाद यांचा बारकाईने आढावा घेतात. पुणे–बँकॉक सेवा रद्द करण्यामागेही हाच व्यावसायिक दृष्टिकोन असावा, असे तज्ज्ञांचे मत आहे. पुढील हंगामात ही सेवा पुन्हा सुरू होईल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *