‘गरिबांची डिफेंडर’ येतेय धडाक्यात! थार-सिएराला थेट टक्कर; महाराष्ट्रातच होणार उत्पादन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०४ मार्च २०२६ ।। एसयूव्हीचा बाजार सध्या पेटला आहे. एकेकाळी स्वप्नात दिसणारी दमदार गाडी आता मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात येऊ लागली आहे. अशातच आता ‘गरिबांची डिफेंडर’ म्हणून ओळख मिळवणारी नवी धडाकेबाज एसयूव्ही भारतात दाखल होण्याच्या तयारीत आहे. JSW Motors लवकरच Jetour T2 ही बॉक्सी, मजबूत आणि थेट ऑफ-रोडिंगला साद घालणारी एसयूव्ही बाजारात आणणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो आणि स्टंट व्हिडीओ पाहता ही गाडी थेट Thar ला भिडेल, अशी चर्चा रंगली आहे. डिझाईनच्या बाबतीत ती आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या Land Rover Defender ची आठवण करून देते, त्यामुळे ग्राहकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

या नव्या प्रकल्पामागे मोठं आंतरराष्ट्रीय समीकरण आहे. Chery Automobile या चिनी कंपनीसोबत भागीदारी करून Jetour T2 भारतात आणली जात आहे. याआधी JSW ने MG Motor सोबत भागीदारी केली होती. आता मात्र स्वतःच्या दमावर एसयूव्ही सेगमेंटमध्ये मोठी एन्ट्री करण्याची तयारी दिसते आहे. Jetour T2 मध्ये LED लाईट स्ट्रिप्स, पिक्सेल डिझाइन फॉग लॅम्प्स, उंच बंपर, स्क्वेअर टेलगेट आणि व्हर्टिकल डोअर हँडल्स यामुळे गाडीला रग्गड लूक मिळतो. इंटिरिअरमध्ये १५.६ इंच टचस्क्रीन, १०.२५ इंच डिजिटल डिस्प्ले, पॅनोरामिक सनरूफ, Sony चे १२ स्पीकर, व्हेंटिलेटेड सीट्स आणि Level-2 ADASसारखी प्रिमियम फीचर्स दिली जाणार आहेत. १.५ लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन आणि २६.७ kWh बॅटरी असलेला प्लग-इन हायब्रीड पर्याय १३९ किमी इलेक्ट्रिक रेंज देईल, असा दावा आहे.

सर्वात मोठी आणि अभिमानाची बाब म्हणजे या गाडीचं उत्पादन महाराष्ट्रात होणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन येथील ६३० एकरांवरील ग्रीनफिल्ड प्लांटमध्ये या एसयूव्हीचं असेंब्ली होणार आहे. वर्षाला तब्बल ५ लाख वाहनांची निर्मिती करण्याची क्षमता या प्रकल्पात असणार आहे. किंमत सुमारे १५ लाखांपासून सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बाजारात आल्यानंतर तिची स्पर्धा Tata Sierra, Hyundai Creta आणि इतर लोकप्रिय मॉडेल्सशी होणार आहे. मजबूत बांधणी, आधुनिक तंत्रज्ञान आणि तुलनेने परवडणारी किंमत यामुळे ही ‘गरिबांची डिफेंडर’ खऱ्या अर्थाने भारतीय रस्त्यांवर धुमाकूळ घालेल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *