“जिवंत राहायचं असेल तर तातडीने बाहेर पडा!” मध्यपूर्वेतील १४ देशांसाठी अमेरिकेचा हाय अलर्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०४ मार्च २०२६ ।। वॉशिंग्टन – मध्यपूर्वेत धग वाढत असताना अमेरिकेने आपल्या नागरिकांसाठी तातडीचा इशारा जारी केला आहे. United States Department of State ने ‘सीरियस सेफ्टी रिस्क’ अलर्ट देत १४ देशांमधून अमेरिकन नागरिकांनी त्वरित बाहेर पडावे, असे आवाहन केले आहे. इस्रायल–इराण तणावानंतर परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत असून ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ल्यांची भीती व्यक्त केली जात आहे. असिस्टंट सेक्रेटरी ऑफ कॉन्सुलर अफेअर्स मोरा नामदार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, “व्यावसायिक विमानसेवा किंवा उपलब्ध कोणत्याही मार्गाने तातडीने बाहेर पडा,” असा स्पष्ट संदेश दिला आहे. अनेक विमानतळांवर उड्डाणे रद्द होत असतानाच हा इशारा देण्यात आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, सौदी अरेबिया ची राजधानी रियाध येथे अमेरिकन दूतावासावर दोन ड्रोन हल्ले झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यांमुळे इमारतीच्या काही भागात आग लागली व किरकोळ नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी परिसरात दहशतीचे वातावरण आहे. दूतावासाने रियाध, जेद्दा आणि धहरानमधील नागरिकांना ‘शेल्टर इन प्लेस’ म्हणजेच घरातच सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे. हल्ल्यांनंतर परिसरात धूर पसरला होता. संरक्षण मंत्रालयाने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले असले तरी सतर्कता वाढवण्यात आली आहे.

अमेरिकेने ज्या १४ देशांतून नागरिकांना बाहेर पडण्यास सांगितले आहे त्यात बहरेन, इजिप्त, इराक, जॉर्डन, कुवेत, लेबनॉन, ओमान, कतार, सीरिया, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन यांचा समावेश आहे. तसेच वेस्ट बँक आणि गाझा परिसरासाठीही विशेष इशारा देण्यात आला आहे. मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक जाहीर करण्यात आले असून STEP.gov वर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इमरजन्सी टास्क फोर्स सक्रिय करण्यात आली असली तरी बहुतांश नागरिक व्यावसायिक उड्डाणांवर अवलंबून आहेत. परिस्थिती झपाट्याने बदलत असल्याने “आता निर्णय घ्या, उद्या उशीर होऊ शकतो,” असा स्पष्ट संदेश अमेरिकेने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *