Stock Market Crash : मध्य–पूर्वेतील तणावाचा धक्का; दोन दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०४ मार्च २०२६ ।। मध्य–पूर्वेतील वाढत्या जिओपॉलिटिकल टेन्शनचे पडसाद आता थेट हिंदुस्थानच्या शेअर बाजारावर उमटताना दिसत आहेत. इराणमधील संकट, तसेच इराण–इस्रायल–अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे जागतिक बाजारांमध्ये घसरण झाली आणि त्याचा फटका देशांतर्गत गुंतवणूकदारांनाही बसला. सलग दोन सत्रांत बाजारात मोठी पडझड झाली असून, गुंतवणूकदारांचे तब्बल ११ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

BSE Sensex आणि Nifty 50 या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी मोठी घसरण नोंदवली. गेल्या आठवड्यात शुक्रवारी सेन्सेक्स ८१,२८७ वर बंद झाला होता; मात्र सोमवारी प्री-ओपनमध्येच मोठी घसरण दिसली. दिवसअखेर सेन्सेक्स सुमारे एक हजार अंकांनी कोसळून ८१ हजारांच्या आसपास बंद झाला. निफ्टीही घसरत २५ हजारांच्या पातळीवर आला. फक्त सोमवारीच गुंतवणूकदारांचे अंदाजे ६.५० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

तज्ज्ञांच्या मते, इराण–इस्रायल–अमेरिका संघर्षामुळे शॉर्ट टर्ममध्ये बाजारात चढउतार राहतील. मात्र दीर्घकालीन दृष्टीकोनातून भारतीय अर्थव्यवस्था सक्षम आहे. Anand Rathi Shares and Stock Brokersच्या सहसंचालिका तन्वी पंचन यांच्या मते, मार्केटमधील जलद करेक्शन कायमस्वरूपी परिणाम करत नाही. याआधीही अशा परिस्थिती आल्या आहेत. जानेवारी २०२६ मध्ये नेट जीएसटी कलेक्शन १.७१ लाख कोटी रुपये झाले असून, आर्थिक वर्ष २०२७ मध्ये महसुलात आणखी वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे पडझडीने घाबरून जाण्याऐवजी संयम आणि आर्थिक शिस्त राखण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *