![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० मार्च २०२६ ।। वेगमर्यादा ओलांडून गाडी पळवणाऱ्या वाहनचालकांसाठी आता पुणे ग्रामीण पोलिसांनी नवा सापळा तयार केला आहे. रस्ते सुरक्षा वाढवण्यासाठी आणि वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी प्रथमच लेझर स्पीड कॅमेऱ्यांचा वापर सुरू केला आहे. सहा महिन्यांच्या पायलट प्रकल्पांतर्गत हा उपक्रम लोणावळा, वडगाव-मावळ आणि यवत पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे वेगात गाडी चालवणारे चालक आता सहजपणे पोलिसांच्या रडारवर येणार आहेत.
‘ब्लूमबर्ग फिलान्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी’च्या सहकार्याने हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. ‘ग्लोबल रोड सेफ्टी पार्टनरशिप’चे वरिष्ठ रोड पोलिसिंग सल्लागार पॉल सिमकॉक्स यांनी ‘टूकॅम’ लेझर स्पीड कॅमेरे पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्याकडे सुपूर्द केले. या आधुनिक कॅमेऱ्यांद्वारे दिवस आणि रात्री दोन्ही वेळेस वाहनांचा वेग अचूकपणे मोजता येणार आहे. विशेष म्हणजे हे कॅमेरे ताशी ३२० किलोमीटरपर्यंतचा वेग नोंदवू शकतात. तसेच ते हातात धरून, ट्रायपॉडवर बसवून किंवा पोलिस वाहनांमध्ये बसवूनही वापरता येतात.
पुणे ग्रामीण रस्ते सुरक्षा अहवालानुसार जिल्ह्यातील प्राणघातक अपघातांपैकी सुमारे ५७ टक्के अपघात ग्रामीण भागात नोंदवले गेले आहेत. २०२३ मध्ये पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत ९८३ अपघातांमध्ये मृत्यूची नोंद झाली असून हा आकडा मागील वर्षाच्या तुलनेत पाच टक्क्यांनी वाढला आहे. या पार्श्वभूमीवर वेगमर्यादा उल्लंघनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पायलट प्रकल्पातून मिळणाऱ्या अनुभवाच्या आधारे भविष्यात संपूर्ण पुणे ग्रामीण भागात ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात राबवण्याचा पोलिसांचा मानस आहे.
