![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० मार्च २०२६ ।। राज्यात उष्णतेची लाट तीव्र होत असताना एसटी प्रवाशांना मात्र स्वस्त आणि शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः भटकंती करावी लागत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई सेंट्रल बस स्थानकात ‘नाथजल’चा अधिकृत स्टॉल अनेक महिन्यांपासून बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. स्थानकातील मोफत पाणपोईची अवस्था अत्यंत अस्वच्छ असल्यामुळे प्रवासी तेथील पाणी पिण्यास धजावत नाहीत. परिणामी कडक उन्हात तहान भागवण्यासाठी प्रवाशांना महागडे बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागत आहे.
एसटी महामंडळाने प्रवाशांना परवडणाऱ्या दरात शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी नोव्हेंबर २०२० मध्ये ‘नाथजल’ योजना सुरू केली होती. रेल्वेच्या ‘रेलनीर’च्या धर्तीवर ही योजना राबवण्यात आली होती. ‘नाथजल’च्या अर्धा लिटर बाटलीची किंमत ९ रुपये तर एक लिटर बाटली १५ रुपये ठेवण्यात आली होती. मात्र मुंबई सेंट्रल बस स्थानकातील अधिकृत स्टॉल बंद असल्यामुळे विक्रेते अन्य कंपन्यांचे बाटलीबंद पाणी देत २० रुपये आकारत असल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे.
उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढलेली असतानाच ‘नाथजल’चा पुरवठा राज्यातील अनेक स्थानकांवर अपुरा असल्याचे चित्र आहे. पुणे, नाशिक, नागपूर आणि अहिल्यानगरसारखी काही मोठी स्थानके वगळता बहुतांश ठिकाणी ‘नाथजल’ उपलब्ध नसल्याची तक्रार आहे. आधीच साध्या बसगाड्यांतून प्रवास करताना उष्णतेचा त्रास सहन करावा लागत असताना स्वस्त पाणीही उपलब्ध नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, ‘नाथजल’ स्टॉल बंद का आहे याबाबत एसटी महामंडळाकडून अधिकृत स्पष्टीकरण अद्याप देण्यात आलेले नाही.
