![]()
इथेनॉलमुक्त पेट्रोलला नकार; E20 सुरक्षित असल्याचा दावा, इंजिन बिघाडाच्या चर्चांवर केंद्राचा पूर्णविराम
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ जुलै २०२६ ।। E20 Petrol: देशभरात E20 पेट्रोलबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर संसदेतून अधिकृत उत्तर मिळाले आहे. इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचे इंजिन खराब होते, मायलेज घटते आणि जुनी वाहने धोक्यात येतात, अशा दाव्यांनी गेल्या काही महिन्यांत सोशल मीडियावर अक्षरशः धुरळा उडवला होता. मात्र, केंद्र सरकारने हे सर्व दावे फेटाळत E20 पेट्रोल पूर्णपणे सुरक्षित असल्याचा ठाम दावा केला आहे. केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी संसदेत स्पष्ट शब्दांत सांगितले की, इथेनॉलमुक्त पेट्रोल पुन्हा सुरू करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारसमोर नाही. उलट देश अधिक स्वच्छ, आधुनिक आणि पर्यावरणपूरक इंधनाकडे वाटचाल करत असून मागे फिरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा स्पष्ट संदेश सरकारने दिला आहे.
सरकारने सादर केलेल्या आकडेवारीनुसार भारताने पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य नियोजित वेळेपेक्षा तब्बल पाच वर्षे आधी गाठले आहे. २०२२-२३ मध्ये सरासरी १२ टक्के असलेले मिश्रण पुढील दोन वर्षांत झपाट्याने वाढून २०२५-२६ मध्ये २० टक्क्यांपर्यंत पोहोचले. यामागे कच्च्या तेलावरील परावलंबित्व कमी करणे, परकीय चलनाची बचत करणे आणि प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे हे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सरकारने स्पष्ट केले. E85 इंधन केवळ फ्लेक्स-फ्युएल वाहनांसाठी असून सामान्य वाहनधारकांना उपलब्ध होणारे इंधन E20च राहणार असल्याचेही संसदेत सांगण्यात आले. त्यामुळे भविष्यात इथेनॉलमिश्रण कमी करण्याची किंवा जुने पेट्रोल पुन्हा उपलब्ध करण्याची शक्यता सरकारने स्पष्टपणे फेटाळून लावली.
E20 पेट्रोलमुळे इंजिनचे नुकसान होते, असा सर्वात मोठा आरोपही सरकारने वैज्ञानिक चाचण्यांच्या आधारे खोडून काढला. नीती आयोग, वाहन उत्पादक कंपन्या आणि विविध संस्थांच्या प्रयोगशाळा तसेच प्रत्यक्ष वापरातील आकडेवारीचा दाखला देत सरकारने सांगितले की, E20 मुळे इंजिनमध्ये असामान्य झीज किंवा बिघाड झाल्याचे कोणतेही ठोस पुरावे आढळलेले नाहीत. एका मोठ्या वाहन उत्पादक कंपनीने तब्बल २.८४ कोटी वाहनांच्या सर्व्हिसिंगमध्ये इथेनॉलमुळे इंजिन निकामी झाल्याची एकही तक्रार नोंदली नसल्याचे सरकारने संसदेत सांगितले. तसेच देशातील २० कोटींहून अधिक दुचाकी आणि ३ कोटींपेक्षा जास्त पेट्रोल कार E20 किंवा तत्सम इंधनावर कोणत्याही मोठ्या तांत्रिक अडचणीशिवाय धावत असल्याचा दावा करण्यात आला. मायलेजमध्ये तीन ते पाच टक्क्यांपर्यंत किरकोळ घट होऊ शकते, मात्र अधिक ऑक्टेनमुळे इंजिनची कार्यक्षमता आणि पिक-अप सुधारण्यास मदत होते, असेही स्पष्ट करण्यात आले.
सरकारच्या मते, इथेनॉलमिश्रित पेट्रोल कार्यक्रम हा केवळ इंधनाचा प्रयोग नसून देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ देणारे मोठे धोरण आहे. या उपक्रमामुळे सुमारे दोन लाख कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत झाली, कच्च्या तेलाची आयात लाखो मेट्रिक टनांनी कमी झाली आणि कार्बन उत्सर्जनात मोठी घट झाली असल्याचा दावा करण्यात आला. ऊस व इतर पिकांपासून इथेनॉल निर्मितीमुळे शेतकऱ्यांनाही लाखो कोटी रुपयांचा आर्थिक लाभ झाल्याचे सरकारने सांगितले. त्यामुळे E20 बाबत निर्माण होणाऱ्या शंका दूर करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणाही उभारली आहे. संसदेतील या स्पष्टोक्तीनंतर E20 पेट्रोलबाबतचा वाद पूर्णपणे थांबेल की नव्या दाव्यांना पुन्हा खतपाणी मिळेल, याकडे आता वाहनधारक, तज्ज्ञ आणि उद्योगक्षेत्राचे लक्ष लागले आहे.