महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १८ सप्टेंबर – आग्रा -आग्रा येथे सध्या निर्माणाधीन असलेल्या वस्तूसंग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला आहे. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाच्या आठवणी यानिमित्ताने जागवल्या जाणार आहेत.
कुठे उभारले जात आहे म्युझियम? जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहल या वास्तूच्या पूर्वेकडील दरवाज्याकडील बाजूला शिल्पग्रामजवळ या म्युझियमचे बांधकाम सुरू आहे.
कसे असेल म्युझियम? मुघल साम्राज्याविषयीचे हे संग्रहालय आहे. 2015 मध्ये समाजवादी पक्षाच्या सरकारने हे म्युझियम बनविण्याचा निर्णय घेतला. पूर्वी याचे नाव ‘मुघल म्युझियम’ असे होते. मात्र, आता ‘छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम’ असे याचे नाव असेल.
म्युझियममध्ये जरदोशी आणि संगमरवरापासून बनवलेल्या जडावाची (पृष्ठभागावर तुकडे बसवून) कलाकुसरही करण्यात येणार आहे. ब्रिटनमधील प्रसिद्ध आर्किटेक्ट डेव्हिड चिप्परफील्ड आणि भारतातील स्टुडिओ आर्कोहम हे मिळून या संग्रहालयाचा आराखडा करीत आहेत.
संग्रहालयात वस्तू प्रदर्शनासाठी जागा, रिसोर्स सेंटर, मुघलकालीन कलाकृती, शस्त्रास्त्रे, पोशाख, नाणी आदींची दालने असतील. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित कलाकृती आणि दस्तऐवज असणार आहेत.
शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ ‘आर्ट गॅलरी’
उत्तर प्रदेशच्या पर्यटन खात्याचे मुख्य सचिव जितेंद्र कुमार यांना मुख्यमंत्री योगींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ आर्ट गॅलरी उभारण्याच्या सूचना दिल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे आग्य्रातील वास्तव्य आणि त्यांची मुघल बादशहा औरंगजेबच्या ताब्यातून स्वतःची अत्यंत हुशारीने करून घेतलेली सुटका या आर्ट गॅलरीत दाखवली जाणार आहे.
मानसिक गुलामगिरीच्या प्रतीकांना अधिक महत्त्व न देता देशाभिमान असलेले विषय आपण पुढे नेले पाहिजेत. मुघल कधीही आपले आदर्श होऊ शकत नाहीत. शिवाजी महाराज आपले आदर्श आहेत.
– योगी आदित्यनाथ,
मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश.
किती खर्च येणार?
140कोटी
ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या या म्युझियमसाठी येणारा खर्च
दरवर्षी 80 लाख पर्यटक येथे भेट देण्याची शक्यता
2.5 हेक्टर एवढ्या परिसरात हे म्युझियम उभारले जात आहे