टोल टाळलात तर खिशाला फटका!”; सरकारचा नवा नियम, चुकवला तर दुप्पट दंड

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० मार्च २०२६ ।। हायवेवरून सुसाट गाडी चालवताना टोलकडे दुर्लक्ष करणाऱ्यांसाठी आता ‘धक्का’ तयार आहे! Government of India ने १७ मार्च २०२६ पासून टोल वसुलीचे नियम अधिक कडक करत नवा कायदा लागू केला आहे. “टोल नंतर भरू” किंवा “काही होत नाही” ही सवय आता महागात पडणार आहे—कारण आता टोल न भरल्यास थेट दुप्पट रक्कम मोजावी लागणार आहे.

नव्या नियमांनुसार ‘Unpaid User Fee’ ही संकल्पना लागू करण्यात आली आहे. म्हणजे, तुमचं वाहन इलेक्ट्रॉनिक टोल सिस्टीममध्ये नोंदवलं गेलं, पण पैसे जमा झाले नाहीत, तर तो थेट ‘थकबाकी’ मानला जाईल. मग सुरू होईल डिजिटल कारवाई! एसएमएस, ईमेल किंवा मोबाईल ॲपद्वारे तुम्हाला ई-नोटीस पाठवली जाईल—त्यात तारीख, ठिकाण, वाहन क्रमांक आणि थकीत रक्कम सगळी माहिती असेल.

पण सरकारने ‘दिलासा’ही दिला आहे. जर ही ई-नोटीस मिळाल्यानंतर तुम्ही ७२ तासांच्या आत पैसे भरले, तर फक्त मूळ टोल भरून सुटका होऊ शकते. मात्र वेळ निघून गेली, तर थेट दुप्पट दंड! एवढंच नाही, जर नोटीस चुकीची वाटली, तर ७२ तासांत तक्रार करण्याची सुविधा आहे—आणि ५ दिवसांत निवारण न झाल्यास दंड आपोआप रद्द होईल.

खरा ‘गेम’ मात्र १५ दिवसांनंतर सुरू होतो! जर टोल भरला नाही आणि तक्रारही केली नाही, तर ही थकबाकी तुमच्या वाहनाच्या अधिकृत रेकॉर्डमध्ये जाईल. त्यानंतर गाडीची नोंदणी, मालकी बदल किंवा इतर महत्त्वाच्या सेवांवर बंदी येऊ शकते.

👉 थोडक्यात:
आता हायवेवर ‘टोल चुकवणे’ म्हणजे थेट आर्थिक तोटा. त्यामुळे प्रवास करताना टोल भरायला विसरू नका—नाहीतर तुमचं बजेट बिघडणार हे नक्की!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *