Pune Post Office Rakhi Service: पुणेकरांनो, राखी पाठवण्याची आता धावपळ संपली!

Spread the love

Loading

देश-विदेशात राखी, भेटवस्तू पोहोचवण्यासाठी टपाल विभागाची ‘वनस्टॉप’ सुविधा

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ ऑगस्ट २०२६ ।। रक्षाबंधन जवळ आले की बहिणीच्या हातातील राखीपेक्षा भावापर्यंत ती वेळेत पोहोचेल का, याचीच चिंता अनेकांना सतावते. विशेषतः भाऊ परदेशात असेल तर पोस्ट, पार्सल, पॅकिंग आणि डिलिव्हरीच्या गणितात सणाचा उत्साहच कमी होतो. याच अडचणीवर पुणे टपाल विभागाने ‘वनस्टॉप राखी सोल्यूशन’चा उपाय शोधला आहे. राखीपासून भेटवस्तू आणि शुभेच्छांपर्यंतच्या वस्तू देशभर किंवा परदेशात पाठवण्यासाठी आवश्यक सुविधा आता पोस्ट ऑफिसमध्ये एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. म्हणजे राखीचा धागा लांब असला तरी प्रक्रिया मात्र सोपी होणार आहे.

या विशेष उपक्रमांतर्गत राखी पाठवण्यासाठी विशेष लिफाफे, सुरक्षित पॅकिंग, स्पीड पोस्ट आणि आंतरराष्ट्रीय पार्सल सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातून देशातील कोणत्याही भागात तसेच परदेशात राहणाऱ्या भावंडांपर्यंत राखी आणि भेटवस्तू पाठवणे अधिक सोयीचे होणार आहे. विशेष म्हणजे परदेशात राखी किंवा पार्सल पाठवणाऱ्या ग्राहकांसाठी घरबसल्या मोफत पिकअपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे हातात राखी आणि डोक्यात पार्सलची चिंता घेऊन पोस्ट ऑफिसच्या रांगेत उभे राहण्याची वेळ काही प्रमाणात कमी होणार आहे.

‘वनस्टॉप’ सुविधेचा खरा फायदा मात्र परदेशात राहणाऱ्या भावंडांना होऊ शकतो. राखीसोबत भेटवस्तू किंवा खाऊ पाठवायचा असल्यास पॅकिंगपासून आंतरराष्ट्रीय पार्सलपर्यंतच्या सेवा एकाच ठिकाणी मिळणार आहेत. रक्षाबंधन हा फक्त राखी बांधण्याचा विधी नसून अंतर कितीही असले तरी नाते जपण्याचा दिवस आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या युगात व्हिडिओ कॉलवर शुभेच्छा देणे सोपे झाले असले, तरी पोस्टाने पोहोचलेली राखी अजूनही भावनिक वजन घेऊन जाते. त्या भावनेला टपाल विभागाने सेवेशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे.

नागरिकांनी ही सुविधा वापरताना मात्र शेवटच्या दिवसाची वाट पाहू नये. परदेशातील पार्सलसाठी वेळ, नियम, वस्तूंची पात्रता आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती आधी घेणे शहाणपणाचे ठरेल. अधिक माहितीसाठी पुणे टपाल विभागातील संदीप बटवाल , साई पाटील , ज्ञानेश्वर अंबुरे  आणि लहू लोहोकरे   यांच्याशी संपर्क साधता येईल. पोस्टमास्टर जनरल प्रीती अग्रवाल यांनी नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. शेवटी राखीचा धागा दोन हातांना जोडतो; टपाल विभागाची ही सेवा त्या धाग्याला देशांच्या सीमा ओलांडून नेण्याचे काम करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *