![]()
उद्घाटन आज; सात तासांत बीड गाठणार, दररोज धावणाऱ्या रेल्वेमुळे विद्यार्थी, नोकरदार आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ सप्टेंबर २०२६ ।। पुणे आणि बीडदरम्यान थेट रेल्वेची वाट पाहणाऱ्या प्रवाशांसाठी अखेर दिलासादायक बातमी आली आहे. गुरुवारी (ता. १७) बीड रेल्वे स्थानकावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या बहुप्रतीक्षित रेल्वेसेवेचे उद्घाटन होणार आहे. रेल्वे बोर्डाने बुधवारी वेळापत्रक जाहीर केले असून, पुणे ते बीड हे अंतर गाडी सुमारे सात तासांत पूर्ण करणार आहे. त्यामुळे मराठवाडा आणि पुणे यांच्यातील प्रवास अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
नवीन रेल्वेला तब्बल १६ डबे असणार असून एका फेरीत सुमारे दोन हजार प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. बीड, आष्टी आणि परिसरातून पुण्याकडे शिक्षण, नोकरी, व्यवसाय किंवा इतर कामांसाठी ये-जा करणाऱ्यांसाठी ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. आतापर्यंत रस्ते वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या प्रवाशांना रेल्वेचा पर्याय उपलब्ध होणार आहे. मात्र, नियमित सेवा नेमक्या कोणत्या तारखेपासून सुरू होईल, याची अधिकृत घोषणा रेल्वे बोर्डाने अद्याप केलेली नाही.
पुणे-बीड गाडी क्रमांक ११४३३ पुणे स्थानकातून रात्री १० वाजून ४५ मिनिटांनी सुटून सकाळी सहा वाजता बीडला पोहोचेल. तर बीड-पुणे गाडी क्रमांक ११४३४ रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी बीडहून रवाना होऊन पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी पुण्यात दाखल होईल. उरुळी, दौंड कॉर्ड लाइन, श्रीगोंदा रोड, अहिल्यानगर, नारायणडोहो, नवीन आष्टी आणि अमळनेर या स्थानकांवर रेल्वेला थांबे देण्यात आले आहेत.
या सेवेचे उद्घाटन बीड स्थानकावर सकाळी साडेअकराच्या सुमारास होणार असून पुणे रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. थेट रेल्वेमुळे पुणे आणि बीडमधील दळणवळणाला नवी जोडणी मिळणार असली, तरी प्रवाशांच्या दृष्टीने खरी कसोटी नियमित सेवा सुरू झाल्यानंतरच लागणार आहे. वेळापत्रक, थांबे आणि वेळेचे पालन यावर या नव्या रेल्वेची उपयुक्तता ठरणार आहे.
