‘अनफिट’ विमानाने उड्डाण कसं? अजितदादांच्या अपघातावरून तपासाला नवं वळण

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ मार्च २०२६ ।। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त करत रोहित पवार यांनी कर्नाटकातील बंगळुरू येथे ‘झीरो एफआयआर’ दाखल केल्याने तपासाला नवे वळण मिळाले आहे. महाराष्ट्रात तक्रार नोंदवली गेली नाही, असा आरोप करत त्यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

२८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सातत्याने संशय व्यक्त करणाऱ्या रोहित पवार यांनी मुंबई, बारामती आणि सीआयडीकडे पाठपुरावा करूनही एफआयआर नोंद झाला नसल्याचे सांगितले.

एफआयआरमधील गंभीर आरोप

दाखल तक्रारीत विमान कंपनी VSR Ventures Private Limited वर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. डीजीसीएच्या ऑडिटनुसार संबंधित बॉम्बार्डियर लिअरजेट ४५ विमान तांत्रिकदृष्ट्या ‘अनफिट’ होते, तसेच देखभालीची कागदपत्रे खोटी दाखवल्याचा आरोप आहे.

याशिवाय, पायलट सुमित कपूर याच्या भूतकाळातील मद्यपानाशी संबंधित नोंदी, उड्डाणाच्या वेळी त्याची संशयास्पद स्थिती, शेवटच्या क्षणी क्रू बदलणे आणि धावपट्टीत अचानक बदल या सर्व बाबींवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. अपघातानंतरही संबंधित कंपनीला ८० कोटींचे देयक दिल्याचा दावाही करण्यात आला आहे.

‘झीरो एफआयआर’मुळे तपास अनिवार्य

‘झीरो एफआयआर’ म्हणजे गुन्हा कुठेही घडला असला तरी कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवता येते. कर्नाटक पोलिसांनी ही तक्रार आता महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग केली असून, त्यामुळे या प्रकरणाचा सखोल फौजदारी तपास करणे अनिवार्य झाले आहे.

सभागृहात गदारोळ

हा मुद्दा विधानसभेत उपस्थित होताच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद झाला. विरोधकांनी सरकारवर निष्क्रियतेचा आरोप करत घोषणाबाजी केली. गोंधळ वाढल्याने सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूब करावे लागले.

या संपूर्ण प्रकरणामुळे अपघातामागील सत्य, तांत्रिक त्रुटी की घातपात—याबाबतचे प्रश्न अधिकच गडद झाले असून, पुढील तपासात काय निष्पन्न होते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *