![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ एप्रिल २०२६ ।। सोन्याच्या दरातील घसरणीचा काळ संपताच बाजाराने पुन्हा उसळी घेतली असून आजच्या दरवाढीने खरेदीदारांना मोठा धक्का दिला आहे. आठवड्याच्या सुरुवातीला कमी झालेले दर आज अचानक वाढल्याने लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे. प्रति तोळा तब्बल १,०३० रुपयांची वाढ झाल्याने बाजारात पुन्हा एकदा महागाईचा प्रभाव जाणवू लागला आहे.
आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा १,४९,२९० रुपयांवर पोहोचला आहे. ८ ग्रॅमसाठी हा दर १,१९,४३२ रुपये इतका झाला असून १० तोळ्यांसाठी तब्बल १४,९२,९०० रुपये मोजावे लागत आहेत. दुसरीकडे २२ कॅरेट सोन्याचा दरही वाढून प्रति तोळा १,३६,८५० रुपये झाला आहे. ८ ग्रॅमसाठी १,०९,४८० रुपये, तर १० तोळ्यांसाठी १३,६८,५०० रुपये असा दर झाला आहे. १८ कॅरेट सोन्यातही वाढ कायम असून प्रति तोळा १,११,९७० रुपयांपर्यंत दर पोहोचले आहेत.
जागतिक घडामोडी, डॉलरमधील चढ-उतार आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे सोन्याच्या किमतींमध्ये सतत बदल होत असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. मात्र, सध्याच्या वाढत्या दरांमुळे सामान्य ग्राहकांना खरेदी करताना दोनदा विचार करावा लागत असून, गुंतवणूकदारही सावध पवित्रा घेताना दिसत आहेत.
