१.९० कोटींचा मुद्देमाल जप्त; पुण्यात वैशाली-रूपालीचे परवाने निलंबित, मुंबईतील सहा पानटपऱ्यांवरही कारवाई
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। आरोग्याच्या नावाखाली नियमबाह्य पूरक उत्पादने विकायची, खाद्यतेलाच्या शुद्धतेबाबत संशय निर्माण करायचा आणि स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवून ग्राहकांच्या ताटात अन्न वाढायचे; अशा बेफिकीर व्यावसायिकांना अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर दणका दिला आहे. १३ नोव्हेंबरच्या कारवाईत १७ आस्थापनांची तपासणी करून तब्बल १ कोटी ९० लाख ८३ हजार ५३१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यात FSSAI ने मान्यता नाकारलेल्या घटकांचा वापर असलेली १ कोटी ३८ लाख ९५ हजार ८५२ रुपयांची आरोग्यपूरक उत्पादने आहेत. मॅग्नेशियम ॲसिटिल टॉरेट आणि बीटा-निकोटिनमाइड मोनोन्यूक्लिओटाइड (NMN) यांसारखे घटक आढळले. ‘रेजुव्हान्स’ कॅप्सूल, ‘अल्टिब्रेन-एस’, ‘मॅग्लाडेन्स’ गोळ्या व सिरप आणि ‘EQOQ’ गोळ्यांची तपासणी करण्यात आली. आवश्यक मंजुरी आणि परवान्यातील खाद्यश्रेणी नसताना उत्पादन व विक्री केल्याचा संशय आहे. नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून अंतिम निष्कर्ष येणे बाकी आहे.
पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील प्रसिद्ध हॉटेल वैशाली आणि रूपाली रेस्टॉरंटचे अन्नव्यवसाय परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले. वैशालीच्या तपासणीत ९८ पैकी केवळ ५८ गुण मिळाले. महिलांच्या स्वच्छतागृहाजवळ कच्च्या मालाचा फ्रीजर, पुरुषांच्या स्वच्छतागृहाशेजारी डोसा-उत्तप्प्याचा तवा, उघड्यावर अन्नपदार्थ आणि कच्च्या भाज्यांमुळे तयार अन्न दूषित होण्याचा धोका आढळला. रूपालीमध्ये उघडे स्वयंपाकघर, पाणी साचणे, अस्वच्छता आणि अन्नपदार्थांवरील लेबल व ‘यूज बाय’ तारखांचा अभाव आढळला. सुधारणा करून लेखी परवानगी मिळेपर्यंत दोन्ही ठिकाणी प्रत्यक्ष विक्री, पार्सल आणि घरपोच सेवा बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. मुंबईत कलाश पान शॉप, वचन पान शॉप, महाराष्ट्र पान शॉप, तळपत्री पान शॉप, गोरखनाथ पान शॉप आणि कालिंद्री पान शॉप या सहा दुकानांतून ३१ हजार १४९ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधी पानमसाला जप्त करण्यात आला. पुण्यातही प्रतिबंधित मालाच्या वाहतुकीप्रकरणी वाहनासह कारवाई करून पाच गुन्हे दाखल झाले.
कोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगाव येथील ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडमधून ४५ लाख ९५ हजार २६० रुपये किमतीचे २१ हजार ४ लिटर संशयित खाद्यतेल जप्त करण्यात आले. पामोलिन, मोहरी, सूर्यफूल, सोयाबीन आणि कापूस बियांच्या तेलाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवालानंतर पुढील कारवाई होईल. ही मोहीम FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ अभियानांतर्गत राबवण्यात आली. पुणे विभागाचे सहआयुक्त श्रीकांत आर. करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांच्या आदेशानुसार रेस्टॉरंटवर कारवाई झाली. मात्र, छापे टाकून माल जप्त करणे पुरेसे नाही; प्रयोगशाळेचे अहवाल, दोषींवरील अंतिम कारवाई आणि बाजारातील नियमबाह्य उत्पादनांची विक्री रोखणेही तितकेच आवश्यक आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना केवळ नोटिसांचा धाक नको, तर कायद्याचा ठोस हिसका बसला पाहिजे!
