![]()
धुळ्यात १०.४ अंशांची नोंद; पहाटे गारवा, दुपारी उन्हाचा चटका कायम
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। राज्यात नोव्हेंबरच्या मध्यावर थंडीची चाहूल अधिक गडद होऊ लागली आहे. पहाटे हुडहुडी भरवणारा गारवा आणि दुपारी अंगाची लाहीलाही करणारे ऊन, अशा विरोधाभासी वातावरणाचा अनुभव नागरिक घेत आहेत. शनिवारी (१४ नोव्हेंबर) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठात १०.५ अंश, निफाडच्या गहू संशोधन केंद्रात ११.५ अंश, तर जेऊर येथे १२ अंश तापमान नोंदले गेले. गोंदिया आणि यवतमाळमध्येही पारा १३ अंशांच्या खाली घसरल्याची नोंद आहे. मात्र, या आकड्यांवरून संपूर्ण राज्यात कडाक्याची थंडी किंवा शीतलहर सुरू झाल्याचा निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल.
राज्यातील कमाल तापमान अनेक ठिकाणी ३३ अंशांच्या पुढे असल्याने सकाळचा गारवा आणि दुपारचे ऊन, हे चित्र कायम आहे. भारतीय हवामान विभागाच्या १२ नोव्हेंबरच्या विस्तारित अंदाजानुसार, १२ ते १८ नोव्हेंबरदरम्यान देशाच्या कोणत्याही भागात शीतलहरीची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. महाराष्ट्रासाठीही १४ ते २० नोव्हेंबर या कालावधीत पावसाचा विशेष इशारा नाही. त्यामुळे थंडीचा कडाका वाढणार, अशा सनसनाटी दाव्यांपेक्षा किमान तापमानातील प्रत्यक्ष बदलांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरातील हवामान बदलांनी वेगळेच संकट उभे केले आहे. आग्नेय बंगालच्या उपसागरातील ठळक कमी दाबाचे क्षेत्र पुढील २४ तासांत तीव्र होऊन depression अर्थात कमी दाबाच्या अधिक तीव्र प्रणालीत रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते उत्तर-वायव्य दिशेने सरकत १६ नोव्हेंबरच्या संध्याकाळच्या सुमारास दक्षिण आणि लगतच्या पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे रूप धारण करू शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. या प्रणालीचा मार्ग आणि किनारपट्टीवरील संभाव्य परिणाम याबाबत अद्याप निश्चितता नाही. मात्र, समुद्रातील वाऱ्यांचा वेग वाढण्याचा इशारा देण्यात आला असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन आहे. महाराष्ट्रात सध्या पावसाचा इशारा नसला, तरी हवामानातील या घडामोडींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
