Pashan Baner Link Road: पाषाण-बाणेर रस्त्याचा कोंडमारा संपणार?

Spread the love

Loading

२१ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ३६ मीटर रुंदीच्या रस्त्याला गती; ७० कोटींचे भूसंपादन, पण प्रत्यक्ष काम आणि पूर्णत्वाची तारीख अद्याप महत्त्वाची

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। पुण्याच्या पश्चिम भागातील पाषाण-बाणेर परिसरातील नागरिकांना वर्षानुवर्षे वाहतूक कोंडीचा शाप भोगावा लागत आहे. विकासाच्या गप्पा मारणाऱ्या प्रशासनाला मात्र एका रस्त्याचा तुटलेला दुवा जोडण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ लागला! अखेर ३६ मीटर रुंदीच्या पाषाण-बाणेर लिंक रोडच्या कामाचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या रस्त्यासह प्रभाग क्रमांक ९ मधील विविध विकासकामांचे भूमिपूजन नुकतेच पार पडले. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी आणि नगरसेविका मयुरी कोकाटे यांच्या प्रयत्नांतून हा प्रश्न मार्गी लागल्याचे सांगण्यात आले. मात्र, वस्तुस्थिती अशी की, या रस्त्याचे नियोजन १९९२ मध्ये झाले, काम २०१४ मध्ये सुरू झाले आणि सुमारे २०० मीटरचा महत्त्वाचा भाग भूसंपादनाच्या वादात अडकला. सप्टेंबर २०२६ मध्ये भूसंपादनाचा अडथळा दूर झाला. महापालिकेने सुमारे ६८ ते ७० कोटी रुपये भरपाई दिल्याचे वृत्त आहे.

या रस्त्यामुळे बाणेर, पाषाण, सुतारवाडी आणि परिसरातील सुमारे अडीच लाख नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र भूमिपूजन म्हणजे रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला, असा अर्थ नाही. जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया, उर्वरित बांधकाम, कंत्राटदार आणि कामाची कालमर्यादा याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडणे आवश्यक आहे. दरम्यान, मयुरी कोकाटे यांच्या पाठपुराव्यामुळे प्रभागातील विकासकामांसाठी नऊ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याचे सांगण्यात आले. यात रस्ते, पदपथ, पथदिवे, पावसाळी पाण्याच्या वाहिन्या, ड्रेनेज, सार्वजनिक स्वच्छतागृहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, बुद्धविहार, क्रीडांगणे, नाल्यांच्या संरक्षक भिंती आणि स्मशानभूमींचा विकास होणार आहे.

सुतारवाडीचा मुख्य रस्ता, सुसगाव व म्हाळुंगे गावांतील मुख्य रस्ते, सूसखिंडीतील ग्रेड सेपरेटर आणि महामार्गालगतचे सर्व्हिस रोड लवकरच मार्गी लावणार असल्याचे भाजप नेते राहुल कोकाटे यांनी सांगितले. या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश बालवडकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, सचिन पाषाणकर, उत्तम जाधव, उमा गाडगीळ, वैदही बापट, प्रवीण आमले, मोरेश्वर बालवडकर, अनिकेत चांदेरे, रोहन कोकाटे, शिवकुमार गोयल, प्रशांत खिंवसरा, विनोद दीक्षित, पुष्कर कुलकर्णी, मनीष मिश्रा, तपस कुमार, अरुण वराडे, रत्नाकर मानकर, हरीश पवार, संजीवनी आवटी आणि सारिका पत्की उपस्थित होते. आता नागरिकांना आश्वासनांचे भूमिपूजन नको; प्रत्यक्ष रस्त्याचे उद्घाटन हवे आहे. कारण पुण्यात रस्ते कागदावर वेगाने धावतात, पण प्रत्यक्षात नागरिकांची वाहने वर्षानुवर्षे कोंडीतच अडकतात!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *