महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी -मुंबई – दि. २० सप्टेंबर -: गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दररोज 20 हजारांपेक्षा जास्त रुग्ण निघत आहेत. त्यामुळे आधीच ताण असलेल्या आरोग्य व्यवस्थेवरचा ताण आणखी वाढला आहे. सगळ्याच शहरांमधल्या कोविड हॉस्पिटल्समध्ये रुग्ण संख्या वाढल्याने आता बेड्च शिल्लक राहिलेले नाहीत. ICUमध्येही फारच कमी बेड्स शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना कोविड हॉस्पिटलमध्ये आता बेड देण्यात येणार नाहीत.अशा रुग्णांना कोविड केअर सेंटर्समध्ये किंवा घरीच क्वारंटाइन राहण्यास सांगितले जाणार असल्याचं आरोग्य विभागाने म्हटलं आहे.
राज्यात दररोज आढळून येणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या जास्त असतांनाच शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही जास्त आहे. शनिवारी दिवसभरात 23 हजार 501 रुग्ण कोरोनामुक्त झालेत तर 21 हजार 907 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 24 तासांमध्ये 425 जणांचा मृत्यू झाला. बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण हे 72.22 टक्के एवढं झालं आहे. तर मृत्यूचं प्रमाण हे 2.71 टक्के एवढं आहे.
कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या 7 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. येत्या 23 सप्टेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह दिल्ली, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पंजाब या राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत आहेत.