Pune Civic Negligence: पाऊस गेला… पण धूळ राहिली ! पुणेकरांचा श्वास अडकला; महापालिका ‘मूकदर्शक’?”

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ एप्रिल २०२६ ।।पुणे शहरात अवकाळी पावसाने धुवाधार हजेरी लावली आणि काही तासांत सगळं वाहून गेलं… पण पाऊस ओसरताच समोर आलं ते आणखी भीषण वास्तव! शहरातील रस्त्यांवर आता धुळीचे ढग उडत आहेत, खडी-मातीचे ढिगारे साचले आहेत आणि नागरिकांचा अक्षरशः श्वास घुसमटतोय. डोळ्यांत जळजळ, तोंडात माती, तर दुचाकीस्वारांना घसरून अपघात—हीच सध्याची पुण्याची अवस्था. कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता, सेनापती बापट रस्ता ते कात्रज-कोंढवा मार्ग… सर्वत्र एकच चित्र. अवघ्या काही मिनिटांच्या पावसाने रस्त्यांना नद्यांचे रूप दिले, पण त्यानंतरची साफसफाई मात्र कुणाच्याच जबाबदारीत नाही, असा संतप्त सवाल पुणेकर विचारत आहेत.

महापालिकेकडे तब्बल ५ हजारांहून अधिक कर्मचारी, स्विपिंग मशिन्स, यंत्रणा असतानाही शहर धुळीत माखलेलं दिसत आहे. पावसाचं पाणी ओसरलं, पण त्यासोबत वाहून आलेली माती, खडी, कचरा रस्त्यावरच साचून राहिला. झाडणकाम करणारी यंत्रणा आणि ठेकेदार अक्षरशः गायब झाल्याचं चित्र आहे. उलट स्विपिंग मशिन्स रस्त्यावर फिरताना धूळ अधिकच उडवत असल्याने नागरिकांचा त्रास वाढत आहे. चौकांमधील वळणांवर पसरलेली खडी दुचाकीस्वारांसाठी जीवघेणी ठरत असून लहान अपघातांची मालिका सुरू झाली आहे. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि व्यापारी वर्ग यांना याचा सर्वाधिक फटका बसतोय.

या सगळ्या गोंधळात सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो—आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी नेमकी कुठे संपते? पावसावेळी पाणी काढण्यापुरतीच मर्यादित राहणारी यंत्रणा, त्यानंतरच्या साफसफाईकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करते. क्षेत्रीय कार्यालये, घनकचरा विभाग, पथ विभाग—सगळेच एकमेकांकडे बोट दाखवत बसल्याचं दिसत आहे. नगरसेवकांचीही डोळेझाक नागरिकांच्या संतापात भर घालत आहे. “पाऊस थांबला की प्रशासन झोपतं का?” असा थेट सवाल आता रस्त्यावरूनच विचारला जातोय. महापालिकेकडून तातडीने कारवाईचे आदेश दिल्याचं सांगितलं जात असलं, तरी प्रत्यक्षात रस्त्यावर धूळच धूळ आहे—आणि पुणेकरांच्या संयमाची मर्यादा आता संपत चालली आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *