महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दुबई – दि. २० सप्टेंबर -: आयपीएल २०२० च्या १३ व्या हंगामाला शानदार प्रांभ झाला आहे. काल (दि. १९) सुरुवातीच्या सामन्यात एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा ५ गडी राखून पराभव करत स्पर्धेत विजयारंभ केला. हा सामना अनेक मार्गांनी एमएससाठी विलक्षण असल्याचे सिद्ध झाले. आयपीएलमध्ये सीएसकेचा कर्णधार म्हणून धोनीचा हा १०० वा विजय होता. कर्णधार म्हणून नाबाद विजय मिळवण्याव्यतिरिक्त त्याने आयपीएलमध्ये १०० झेल घेण्याचा पराक्रमही केला आहे.
महेंद्रसिंह धोनीचे आयपीएल स्पर्धेत १०० झेल पूर्ण झाले आहेत. यातील ९६ झेल त्याने कर्णधार म्हणून घेतले आहेत तर, ४ झेल हे क्षेत्ररक्षण करताना झेलले आहेत. या मोठ्या यशस्वी कामगिरी व्यतिरिक्त त्याने आणखी एक विक्रम केला आहे. जो टी २० क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही यष्टीरक्षकाने केलेला नाही. या सामन्यात एमएस धोनीने मुंबईच्या दोन फलंदाजांचा झेल विकेटच्या मागे पकडला. त्याने लुंगी नगिदीच्या गोलंदाजीवर किरोन पोलार्ड आणि कृणाल पंड्याचे झेल टिपले आणि टी २० क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक म्हणून २५० बळी पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला यष्टीरक्षक ठरला आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध पहिल्याच सामन्यात सीएसकेने आपले सामर्थ्य दाखवून विरोधी मुंबई इंडियन्सला पराभवाची धुळ चाखायला भाग पाडले. सीएसकेच्या संघात सुरेश रैना आणि हरभजन सिंगसारखे अनुभवी खेळाडू नव्हते. त्यांची गैरहजेरी संघाला जाणवेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती मात्र, इतर खेळाडूंनी चांगली खेळी करून आयपीएलमध्ये विजयारंभ केला.
या सामन्यात मुंबईच्या संघाने २० षटकांत ९ विकेट गमावून १६२ धावा केल्या. सीएसकेच्या गोलंदाजांणी टीच्चून मारा केला. त्यामुळे मुंबई इंडियन्सला मोठी धावसंख्या करता आली नाही. विजयी लक्षाचा पाठलाग करताना धोनीच्या सीएसकेची सुरुवात खराब झाली. पण अंबाती रायुडू आणि फॉफ डुप्लेसिसच्या अर्धशतकांच्या जोरावर संघाने विजयाला गवसणी घातली.