✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ एप्रिल २०२६ ।। भारतासह अनेक देशांसाठी दिलासादायक ठरणारी मोठी घडामोड समोर आली आहे. अमेरिकेने रशियन कच्च्या तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांवरील निर्बंधांत दिलेली सूट आणखी एक महिन्यासाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. Donald Trump प्रशासनाकडून १७ एप्रिल रोजी नवीन परवाना जारी करण्यात आला असून, त्यानुसार आता १६ मे २०२६ पर्यंत रशियन तेलाची खरेदी सुरू ठेवता येणार आहे. या निर्णयामुळे भारताला स्वस्त दरात कच्चे तेल मिळण्याचा मार्ग खुला झाला असून, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यास मोठी मदत होणार आहे. विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी ही सूट पुढे वाढवली जाणार नसल्याचे संकेत दिले होते. मात्र अचानक घेतलेल्या या यू-टर्नमुळे ऊर्जा बाजारात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
जागतिक ऊर्जा बाजारातील अस्थिरता आणि मध्यपूर्वेतील तणाव लक्षात घेता अमेरिकेने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. विशेषतः इराणविरोधातील संघर्षामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत ऊर्जा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी ही सवलत वाढवण्यात आली आहे. ११ एप्रिलला संपलेल्या पूर्वीच्या सवलतीला आता मुदतवाढ देण्यात आली असून, नव्या परवान्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की इराण, क्युबा आणि उत्तर कोरियाशी संबंधित कोणत्याही व्यवहाराला या सूटचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे रशियन तेलपुरवठा सुरू ठेवत असतानाच अमेरिकेने आपल्या धोरणात्मक मर्यादाही कायम ठेवल्या आहेत.
या निर्णयाचा भारताला थेट फायदा होणार आहे. मार्च २०२६मध्ये भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी तब्बल तीनपट वाढवत ५.८ अब्ज डॉलरपर्यंत नेली होती. रशिया सध्या भारताचा सर्वात महत्त्वाचा तेलपुरवठादार बनला आहे. रशियन राजदूतांनीही भारताला गरजेनुसार कच्चे तेल, एलपीजी आणि एलएनजीचा पुरवठा करण्याची तयारी दर्शवली होती. अमेरिकेच्या नव्या परवान्यामुळे भारतीय रिफायनरी कंपन्यांना कोणत्याही मोठ्या अडथळ्यांशिवाय तेल खरेदी करता येणार आहे. यामुळे देशांतर्गत इंधनदर स्थिर राहण्यास मदत होईल आणि सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्या फटक्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.
