![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ एप्रिल २०२६ ।। साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सराफा बाजार पुन्हा एकदा उजळून निघाला आहे. यंदा सोन्याच्या खरेदीत पारंपरिक उत्साहासोबतच ‘स्मार्ट प्लॅनिंग’चा ट्रेंड स्पष्टपणे दिसत आहे. सोन्याच्या दरातील सततच्या चढ-उतारामुळे ग्राहक आता अधिक सजग झाले असून, सणाच्या दिवशी भाववाढीचा फटका बसू नये म्हणून अनेकांनी आगाऊ बुकिंगला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या काही दिवस आधीच बाजारपेठेत खरेदीची चांगलीच लगबग सुरू झाली आहे.
विशेषतः ‘प्राइज लॉक’ या सुविधेला ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना ठराविक दिवशी ठरलेल्या दरात दागिने बुक करता येतात आणि सणाच्या दिवशी भाव वाढला तरी त्याचा अतिरिक्त भार सहन करावा लागत नाही. यामुळे नियोजनबद्ध आणि सुरक्षित खरेदीला चालना मिळाली आहे. यंदा ग्राहक मोठ्या, जड आणि पारंपरिक दागिन्यांपेक्षा हलके, आकर्षक आणि दैनंदिन वापरासाठी उपयुक्त डिझाइन्सकडे अधिक वळताना दिसत आहेत. नोकरदार महिला, तरुण वर्ग आणि लहान गुंतवणुकीचा विचार करणारे ग्राहक हलक्या दागिन्यांना पसंती देत आहेत. सोन्याची नाणी, छोटे दागिने आणि चांदीच्या भेटवस्तूंनाही चांगली मागणी असल्याचे चित्र आहे.
Saurabh Gadgil यांनी सांगितले की, “यंदा अक्षय तृतीया लग्नसराईच्या हंगामासोबत येत असल्याने दागिने खरेदीचा उत्साह वाढलेला आहे. सोन्याचे भाव उच्चांकावर असले तरी ग्राहकांच्या खरेदीवर त्याचा फारसा परिणाम होत नाही.” तर Fattehchand Ranka यांनीही ग्राहकांचा कल आता परंपरेसोबत सुरक्षित गुंतवणुकीकडे असल्याचे स्पष्ट केले. “अक्षय तृतीया हा समृद्धीचा दिवस मानला जात असल्याने या दिवशी सोन्याची खरेदी ही केवळ परंपरा नसून सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिली जाते,” असे त्यांनी नमूद केले. यंदा हलके, आधुनिक आणि उपयोगी डिझाइन्सची मागणी वाढल्याने सराफा बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
