Gold Silver Price Today : सोन्याला अचानक ब्रेक! ८०० रुपयांनी घसरले दर, चांदी तब्बल ५ हजारांनी स्वस्त; खरेदीदारांना मोठा दिलासा

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ एप्रिल २०२६ ।। आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्या-चांदीच्या बाजारातून ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या दरांना अखेर ब्रेक लागला असून, जळगावसह देशभरातील सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण नोंदवली गेली आहे. उत्तर महाराष्ट्राची सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावमध्ये सोन्याचा भाव तब्बल ८०० रुपयांनी घसरला, तर चांदीच्या दरात थेट ५ हजार रुपयांची मोठी कपात झाली. त्यामुळे लग्नसराईच्या हंगामात दागिने खरेदीची तयारी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून “आज घेऊ की उद्या?” या संभ्रमात असलेल्या ग्राहकांनी आता सराफ बाजाराकडे पुन्हा मोर्चा वळवला आहे.

जळगाव सराफ बाजारातील ताज्या माहितीनुसार, आज जीएसटीसह १० ग्रॅम सोन्याचा दर १ लाख ५६ हजार ६५० रुपयांवर आला आहे. दुसरीकडे, चांदीचा दर प्रति किलो २ लाख ६२ हजार ६५० रुपयांवर स्थिरावला आहे. एमसीएक्स (MCX) फ्युचर मार्केटमध्येही याच घसरणीचे प्रतिबिंब दिसून आले. सकाळी दहा वाजेच्या सुमारास सोन्याचा वायदा भाव १.०३ टक्क्यांनी घसरून १,५३,०१८ रुपयांवर व्यवहार करत होता. तर ५ मे २०२६ एक्सपायरीच्या चांदीच्या वायद्यात ५,११० रुपयांची घसरण होऊन भाव २,५३,४५३ रुपयांवर पोहोचला. बाजारातील या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्येही नव्याने हालचाल सुरू झाली आहे.

दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि हैदराबादमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर साधारण १.५५ लाखांच्या आसपास आहे, तर चेन्नईमध्ये तो १.५६ लाखांवर पोहोचला आहे. २२ कॅरेट सोन्याचे दर १.४२ ते १.४३ लाखांच्या दरम्यान आहेत. चांदीच्या बाबतीत दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे १० ग्रॅम चांदीचा दर २,७५० रुपये असून १०० ग्रॅमसाठी २७,५०० रुपये मोजावे लागत आहेत. चेन्नईमध्ये हा दर थोडा जास्त म्हणजे २,८०० रुपये आहे. तज्ज्ञांच्या मते, जागतिक बाजारातील अस्थिरता, डॉलरच्या हालचाली आणि शेअर बाजारातील चढ-उतार यामुळे सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये अशी हालचाल होत आहे. मात्र ऐन लग्नसराईच्या काळात आलेली ही घसरण ग्राहकांसाठी ‘सुवर्णसंधी’ ठरत असून, बाजारात पुन्हा खरेदीचा उत्साह दिसू लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *