![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ एप्रिल २०२६ ।। पिंपरी-चिंचवडच्या भूमीत पुन्हा एकदा मानवतेचा स्पर्श जाणवणार आहे. मानव एकता दिवस निमित्त २४ एप्रिल २०२६ रोजी सेवा, प्रेम आणि आध्यात्मिक एकात्मतेचा भव्य संगम रंगणार आहे. संत निरंकारी मिशन तर्फे आयोजित हा उत्सव केवळ धार्मिक कार्यक्रम नाही, तर माणसामाणसांमधील भेद मिटवून ‘आपण सारे एक’ हा संदेश देणारा जिवंत अनुभव आहे. बाबा गुरबचन सिंह यांच्या पावन स्मृतीला वंदन करत हा दिवस श्रद्धा आणि सेवाभावाने साजरा केला जाणार आहे.
या दिवशी पुण्यातील विविध सत्संग भवनांमध्ये भक्तीचा दरवळ अनुभवायला मिळेल. माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमित जी यांच्या आशीर्वादाने आयोजित सत्संगांमध्ये भक्त प्रेम, शांतता आणि आत्मिक समाधानाचा अनुभव घेतील. देश-विदेशातील निरंकारी भक्तही या दिवशी एकत्र येऊन मानवतेच्या एकात्मतेचा संदेश अधिक दृढ करतील. हा सोहळा म्हणजे केवळ प्रवचनांचा कार्यक्रम नाही, तर अंतर्मनाला स्पर्श करणारा आध्यात्मिक उत्सव आहे.
याच दिवशी सेवाभावाचा खरा अर्थ साकार होणार आहे तो भव्य रक्तदान शिबिरांमधून. काळेवाडी आणि चंदननगर येथील सत्संग भवनांमध्ये सकाळी ८ ते दुपारी ५ या वेळेत रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. YCM Hospital, ससून रुग्णालय आणि निरंकारी रक्तपेढीचे तज्ज्ञ डॉक्टर या सेवायज्ञात सहभागी होणार आहेत. श्रद्धा, समर्पण आणि मानवतेची जाणीव यांचा संगम असलेला हा उपक्रम प्रत्येकाला एकच संदेश देतो—खरी भक्ती ही केवळ शब्दांत नसून, ती निस्वार्थ सेवेतूनच प्रकट होते.
