लॉकडाउनमुळे दोन हजारांच्या नोटांच्या छपाईवर परिणाम झाल्याची कबुली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – नवीदिल्ली – दि. २१ सप्टेंबर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या केंद्र सरकारने २०१६ साली लागू केलेल्या नोटबंदीनंतर चलनात आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे अर्थमंत्रालयाने शनिवारी लोकसभेत दिलेल्या उत्तरात म्हटलं आहे. अर्थमंत्रालयाचे मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार ठराविक मुल्याच्या नोटा छापण्याचा निर्णय सरकार आरबीआयच्या सल्ल्याने घेतले. लोकांकडून दैनंदिन व्यवहारामध्ये होणाऱ्या मागणीच्या आधारावर यांसंदर्भातील निर्णय घेतले जातात असंही ठाकूर यांनी स्पष्ट केलं. मागील काही महिन्यांपासून दोन हजारच्या नोटांसंदर्भात असणारा संभ्रम सरकारने दिलेल्या उत्तरमुळे दूर झाला आहे.

२०१९-२० च्या आर्थिक वर्षात दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली नव्हती असंही अर्थमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. “मात्र भविष्यातही दोन हजारच्या नोटांची छपाई थांबवण्यासंदर्भात सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही,” असंही ठाकूर यांनी उत्तरामध्ये नमूद केलं आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

याचप्रमाणे ठाकूर यांनी, ३१ मार्च २०२० पर्यंत देशात दोन हजाराच्या २७ हजार ३९८ लाख नोटा चलनात आहे असं सांगितलं. हाच आकडा ३१ मार्च २०१९ साली ३२ हजार ९१० लाख इतका होता. मात्र याचबरोबर ठाकूर यांनी आरबीआयकडून केंद्र सरकारला देण्यात आलेल्या माहितीनुसार करोनामुळे देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे काही काळासाठी दोन हजारच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली होती, असेही सांगितले आहे. मात्र टप्प्याटप्प्यात या नोटांची छपाई पुन्हा सुरु करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या निर्देशांनुसार ही छपाई पुन्हा सुरु करण्यात आली आहे, असं ठाकूर म्हणाले.

बीएरबीएनएमपीएलमधील (भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड) नोटांची छपाई २३ मार्च २०२० ते ३ मे २०२० दरम्यान बंद करण्यात आली होती. ४ मे पासून बीएरबीएनएमपीएलमधील नोटांच्या छपाईचे काम पुन्हा सुरु करण्यात आले. एसपीएमसीआयएलने (सिक्युरिटी प्रिटींग अॅण्ड मिटिंग कॉर्परेशन ऑफ इंडिया) सरकारला दिलेल्या माहितीनुसार करोना लॉकडाउनमुळे नोटा छापाईवर परिणाम झाला.

एसपीएमसीआयएलच्या नाशिक आणि दवासमधील नोट छपाईचे कारखाने २३ मार्चपासून लॉकडाउन लागू झाल्यानंतर बंद करण्यात आले. नाशिकमधील करन्सी नोट प्रेस ८ जून २०२० रोजी आणि देवासमधील बँक नोट प्रेस १ जून २०२० रोजी पुन्हा सुरु करण्यात आल्याची माहिती ठाकूर यांनी लोकसभेत दिली. नोटांची छपाई बंद होती तरी लॉकाडाऊनच्या कालावधीमध्ये आरबीआयला तसेच अधिकृत संस्थांना दोन्ही ठिकाणांहून गरजेनुसार नोटा पुरवण्यात आल्या. रेल्वेच्या मदतीने (इंडियन रेल्वे ट्रेजरी वॅगन्स) या नोटांच्या पुरवठा करण्यात आल्याचे ठाकूर यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *