महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. २१ सप्टेंबर – गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या शिक्षक भरतीला विशेष परवानगी द्यावी, या मागणीच्या पूर्ततेसाठी अर्थ खात्याकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्याची माहिती डी.एड., बी.एड. स्टुडन्ट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष मगर यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्यासाठी मे महिन्यात सरकारने पदभरतीवर बंदी घालण्यात आली. मात्र, दहा-बारा वर्षापासून रखडलेली शिक्षक भरती तीन वर्षांपूर्वी सुरू झाली आणि कोरोनामुळे त्यालाही स्थगिती देण्यात आली. परिणामी शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या हजारो उमेदवारांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या भरती प्रक्रियेला वित्त विभागाने विशेष परवानगी द्यावी, या मागणीच्या पुर्ततेसाठी डी.एड., बी.एड. स्टुडन्ट असोसिएशनमार्फत औरंगाबाद ते मुंबई मंत्रालय अन्नत्याग पायी दिंडी आंदोलन सुरू केले होते.ही दिंडी ठाण्यामध्ये दाखल झाल्यावर शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी आंदोलनकर्त्याची दखल घेऊन संघटनेच्या संघटनेचे अध्यक्ष संतोष मगर यांच्याशी चर्चा केली.
त्यानंतर शालेय शिक्षण मंत्र्यांना भेटण्यासाठी शिष्टमंडळाला आमंत्रित करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सावंत, शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार बाळाराम पाटील यांच्या समवेत असोसिएशनचे अध्यक्ष संतोष मगर, राज्य उपाध्यक्ष संदीप कांबळे, जीवन काकडे आदी उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत ५० टक्के मागासवर्गीय पदे भरतीबाबत सरकार सकारात्मक असून लवकरच कार्यवाही करणार असल्याची माहिती देखील यावेळी दिल्याचे मगर यांनी सांगितले.