![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. 21 मे २०२६ ।। पुणेकरांच्या संयमाची रोज परीक्षा घेणाऱ्या वाहतूक कोंडीवर अखेर मेट्रोचा बुलडोझर चालू लागला आहे. वनाज ते चांदणी चौक या विस्तारित मेट्रोमार्गाच्या कामाला आता प्रत्यक्ष वेग मिळाला असून, सध्या विविध ठिकाणी मातीपरीक्षण सुरू आहे. पुण्यात रस्ता खोदला की नागरिक आधीच ‘पुन्हा एकदा धूळ, डायव्हर्शन आणि हॉर्नांचा महोत्सव!’ असे म्हणून कपाळावर हात मारतात; पण यावेळी प्रशासनाने हा त्रास भविष्यातील मोठ्या दिलाशासाठी असल्याचा दावा केला आहे. कोथरूडची वाढती लोकसंख्या आणि चांदणी चौकातील रोजची कोंडी पाहता, हा मेट्रोमार्ग पुणेकरांसाठी केवळ सुविधा नव्हे तर ‘वाहतुकीतून सुटका’ ठरणार असल्याचे चित्र आहे. डिसेंबर २०२७ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, महामेट्रोने कामाला गती दिल्याचे स्पष्ट दिसू लागले आहे.
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पिलर उभारणीसाठी जमिनीची क्षमता तपासली जात आहे. त्यानंतर प्रत्यक्ष खांब उभारणी आणि बांधकामाला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे “काम करा पण वाहतूक अडवू नका” या पुणेकरांच्या कायमस्वरूपी मागणीची दखल घेत प्रशासनाने वाहतुकीला कमीत कमी अडथळा निर्माण होईल, असे नियोजन केल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रोचे कामही युद्धपातळीवर सुरू असून, मार्केट यार्ड आणि बिबवेवाडी परिसरात वाहतुकीचे नवे गणित तयार झाले आहे. बीआरटी लेन तात्पुरती बंद करून बस आणि इतर वाहनांसाठी स्वतंत्र डायव्हर्शन लेन तयार करण्यात आली आहे. पीएमपी बस आता फुटपाथलगत नव्या मार्गाने धावणार असून, काही बसथांबे स्थलांतरित करण्यात आले आहेत. पुणेकरांना आता प्रवासापूर्वी बस कुठून सुटते याचा ‘गृहपाठ’ करूनच घराबाहेर पडावे लागणार, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
कात्रज पोलिस चौकीसमोरील पीएमपी मुख्य बसस्थानकावर मेट्रो स्टेशनच्या कामाला सुरुवात झाल्याने ते तात्पुरते बंद करण्यात आले आहे. परिणामी अनेक बसमार्गांचे थांबे बदलण्यात आले असून, प्रवाशांना नव्या व्यवस्थेची सवय होईपर्यंत थोडी कसरत करावी लागणार आहे. पुलाखालून, सर्व्हिस रोडवरून, नव्या लेनमधून बस धावणार असल्याने सुरुवातीला गोंधळ उडण्याची शक्यता प्रशासनालाही मान्य आहे. मात्र पुणेकरांच्या दृष्टीने हे चित्र नवीन नाही. पुण्यात विकासकाम सुरू झालं की नागरिक आधी त्रास सहन करतात आणि नंतर त्याच कामाचं उद्घाटन पाहून समाधान मानतात! आता मेट्रोच्या या विस्तारित जाळ्यामुळे भविष्यातील प्रवास वेगवान आणि सुसह्य होणार असेल, तर काही काळाचा हा त्रास पुणेकर स्वीकारतीलही; पण एक अपेक्षा मात्र कायम राहील — कामाचा वेग मेट्रोसारखा असावा, गोगलगायीसारखा नव्हे!
