![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. 21 मे २०२६ ।। पुणेकरांनी वाहन घेताना देवाला नारळ फोडला, पण ते वाहन उभं कुठं करायचं याचा विचार मात्र देवावरच सोडला! परिणामी पुण्यातील रस्ते हे आता रस्ते कमी आणि ‘जिथे जागा तिथे गाडी’ अशा बिनधास्त संस्कृतीचे सार्वजनिक प्रदर्शन अधिक झाले आहे. चौकात वळण घ्यायचं म्हटलं की समोर एखादी दुचाकी महाराजांच्या थाटात उभी, तर बाजूला चारचाकीने अर्धा रस्ता गिळलेला! या पुणेरी पार्किंग पुराणाला आता महापालिकेने लगाम घालण्याचा निर्धार केला असून स्वतंत्र पार्किंग धोरण लागू करण्याची तयारी सुरू झाली आहे. विमाननगर आणि लक्ष्मी रस्ता या दोन भागांतून या मोहिमेची सुरुवात होणार असल्याने ‘गाडी लावा पण अक्कलही वापरा’ असा संदेश प्रशासनाने अप्रत्यक्षपणे दिला आहे.
नव्या धोरणात पार्किंगसाठी स्पष्ट नियम आखले जाणार आहेत. कुठे वाहन उभं करायचं, कुठे अजिबात नाही, चौकाजवळ किती अंतर मोकळं ठेवायचं, याचा तपशील ठरवला जाणार आहे. विशेष म्हणजे मुख्य चौकापासून १५ मीटर अंतरात पार्किंगला पूर्ण बंदी असणार आहे. म्हणजे आतापर्यंत “फक्त दोन मिनिटं” म्हणून गाडी अडवणाऱ्यांची पुणेरी सबब आता चालणार नाही. रस्त्याच्या रुंदीनुसार पार्किंग क्षमता निश्चित होईल, फुटपाथ मोकळे केले जातील आणि वाहतुकीचा जीव घोटणाऱ्या बेकायदा पार्किंगवर कारवाई होईल. वाहतूक पोलिस, आरटीओ, पीएमपीएमएल आणि महापालिका यांचा संयुक्त समन्वय असणार असल्याने यंत्रणा तरी कागदावर भक्कम दिसतेय. आता प्रश्न एवढाच — नियम रस्त्यावर उतरतील की फक्त फाइलमध्येच पार्क होतील?
महापालिकेच्या या योजनेत मल्टी-स्टोरेज पार्किंगचाही समावेश आहे. गर्दीच्या रस्त्यांवरील वाहनांचा भार कमी करून नागरिकांना शिस्तबद्ध सुविधा देण्याचा दावा प्रशासन करत आहे. मात्र पुणेकरांना अनुभव असा आहे की शहरात योजना आधी येते आणि अंमलबजावणी तिच्या मागे दमछाक करत धावत असते! सध्या आचारसंहितेमुळे या धोरणाला अंतिम मंजुरी मिळालेली नसली, तरी ३० जूननंतर ते जनरल बॉडीसमोर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांनी आता दोन गोष्टींसाठी तयारी ठेवावी — एक म्हणजे नियमबद्ध पार्किंग आणि दुसरी म्हणजे नियम तोडल्यावर होणारी दंडात्मक ‘पुणेरी प्रसाद’ प्राप्ती! शहराला वाहतूक कोंडीतून बाहेर काढायचं असेल, तर ‘माझी गाडी, माझी मर्जी’ हा हट्ट बाजूला ठेवून ‘माझा रस्ता, आपली जबाबदारी’ ही भावना स्वीकारावी लागणार आहे.
