मोदी-मेलोनी मैत्रीचा नवा महास्फोट: २०२९ पर्यंत २२ अब्ज युरोच्या व्यापाराचे लक्ष्य

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. 21 मे २०२६ ।। रोमच्या राजकीय रंगमंचावर भारत आणि इटलीने मैत्रीचा असा हात मिळवला की जागतिक राजकारणाचे अनेक जाणकारही थबकून पाहू लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या भेटीनंतर दोन्ही देशांनी संबंधांना थेट “स्पेशल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप”चा दर्जा दिला आणि भारत-इटली संबंधांना नव्या युगाची दिशा मिळाली. गेली तीन वर्षे सुरू असलेली राजनैतिक जवळीक आता अधिकृत शिक्कामोर्तबापर्यंत पोहोचली आहे. जागतिक स्तरावर बदलत असलेल्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर हा करार केवळ मैत्रीचा नाही, तर आर्थिक, तांत्रिक आणि सामरिक शक्तींच्या नव्या समीकरणांचा संकेत मानला जात आहे. रोममध्ये झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास स्पष्ट सांगत होता — भारत आणि इटली आता फक्त मित्र राष्ट्रे राहिली नाहीत, तर भविष्यातील जागतिक भागीदारीचे नवे केंद्र बनू पाहत आहेत.

या नव्या भागीदारीचा सर्वात मोठा परिणाम व्यापार क्षेत्रात दिसणार आहे. सध्या १४ अब्ज युरोंवर असलेला द्विपक्षीय व्यापार थेट २२ अब्ज युरोंपर्यंत नेण्याचे लक्ष्य २०२९ पर्यंत निश्चित करण्यात आले आहे. म्हणजे दोन्ही देशांनी आर्थिक संबंधांना आता टॉप गिअरमध्ये टाकण्याचा निर्णय घेतला आहे. युरोपियन युनियनसोबतच्या प्रस्तावित मुक्त व्यापार करारामुळे भारतीय उद्योगांना मोठी बाजारपेठ खुली होणार आहे, तर इटालियन कंपन्यांनाही भारताच्या प्रचंड बाजारपेठेत नवे दरवाजे उघडणार आहेत. आधीच ८०० हून अधिक इटालियन कंपन्या भारताच्या विकास प्रवासात सक्रिय आहेत. आता AI, क्वांटम टेक्नॉलॉजी, अंतराळ संशोधन आणि नागरी अणुऊर्जा या क्षेत्रांतही दोन्ही देशांनी सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. “भारत-इटली इनोव्हेशन सेंटर” स्थापन करण्याची घोषणा म्हणजे या भागीदारीला तांत्रिक इंजिन जोडल्यासारखंच आहे.

पण या भेटीचं महत्त्व फक्त व्यापार आणि तंत्रज्ञानापुरतं मर्यादित नाही. दहशतवादाविरोधात संयुक्त लढा, जागतिक शांततेसाठी मुत्सद्देगिरीचा आग्रह आणि युक्रेनसह पश्चिम आशियातील तणावावर संवादातून तोडगा काढण्याची भूमिका — या सगळ्यांतून भारताने पुन्हा एकदा जबाबदार जागतिक शक्ती म्हणून आपली भूमिका अधोरेखित केली. मोदींनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “दहशतवादाचा फक्त निषेध करून चालत नाही; त्याची मुळे उपटावी लागतात.” हा संदेश जगासाठीही तितकाच महत्त्वाचा होता. पाच देशांच्या दौऱ्याच्या अखेरीस झालेली ही भेट भारताच्या परराष्ट्र धोरणासाठी मोठा राजनैतिक विजय मानली जात आहे. आणि जॉर्जिया मेलोनींना दिलेलं भारत भेटीचं निमंत्रण हे सांगून गेलं — रोममध्ये फक्त चर्चा झाली नाही, तर भारत-इटली मैत्रीच्या नव्या सुवर्णकाळाची पायाभरणी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *