महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. 21 मे २०२६ ।। देशात आता औषध विक्रीचाही बाजार “क्लिक करा आणि घरपोच घ्या” या मोहात अडकला आहे; पण या चमकदार डिजिटल पडद्यामागे आरोग्याशी सुरू असलेला धोकादायक खेळ आता उघडपणे समोर येऊ लागला आहे. ऑनलाईन औषध विक्रीविरोधात देशभरातील मेडिकल दुकानदारांनी संप पुकारला आणि बुधवारी हजारो औषध दुकाने बंद ठेवून सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. औषध विक्रेत्यांचा आरोप स्पष्ट आहे — प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून बसलं आहे आणि ई-कॉमर्स कंपन्या नियमांना हरताळ फासत घरपोच औषधांचा धंदा फोफाववत आहेत. डॉक्टरांची चिठ्ठी खरी की खोटी, औषध योग्य की अयोग्य, रुग्णाला त्याची गरज आहे की नाही — या मूलभूत प्रश्नांची पडताळणीच होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याशी थेट जुगार खेळला जात असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे.
या संपूर्ण प्रकरणात सर्वाधिक धक्कादायक मुद्दा म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI चा गैरवापर. तंत्रज्ञानाने माणसाचं आयुष्य सोपं व्हावं म्हणून शोध लावला गेला; पण आता त्याच AI च्या मदतीने डॉक्टरांच्या बनावट प्रिस्क्रिप्शन तयार करून नशा आणणारी किंवा प्रतिबंधित औषधे सहज मागवली जात असल्याचा आरोप समोर आला आहे. म्हणजे आजवर बनावट नोटा आणि बनावट कागदपत्रं ऐकली होती; आता बनावट डॉक्टरही मोबाईलमध्ये तयार होऊ लागले आहेत! राष्ट्रीय केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी सरकारवर थेट निशाणा साधत, “एकीकडे ऑनलाईन विक्रेत्यांना मोकळं रान आणि दुसरीकडे पारंपरिक मेडिकल दुकानदारांवर नियमांचा बोजा,” अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. औषध म्हणजे साबण, बूट किंवा मोबाईल कव्हर नव्हे; चुकीचं औषध थेट माणसाच्या जीवाशी खेळू शकतं, हे प्रशासन विसरत चालल्याची भावना आता केमिस्ट संघटनांमध्ये तीव्र झाली आहे.
ऑनलाईन औषध विक्रीचे धोके केवळ तांत्रिक नाहीत, तर थेट सामाजिक आणि वैद्यकीय आहेत. औषधाची गुणवत्ता, साठवणूक, मुदत, योग्य डोस आणि रुग्णाचा वैद्यकीय इतिहास — या सगळ्याची खातरजमा न होता औषधं घरपोच पोहोचत आहेत. परिणामी चुकीच्या औषधांमुळे दुष्परिणाम वाढण्याची शक्यता अधिक गंभीर बनली आहे. फार्मासिस्टचे मार्गदर्शन न मिळाल्याने अनेक रुग्ण “गुगल डॉक्टर” आणि “मोबाईल मेडिकल” यांच्या भरोशावर औषधं घेत आहेत. पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल बेलकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “औषध ही सामान्य वस्तू नाही; ती थेट मानवी जीवाशी संबंधित गोष्ट आहे.” पण डिजिटल युगात वेग, सवलत आणि घरपोच सुविधा यांच्या नादात आरोग्याचा प्रश्न दुय्यम ठरत चालला आहे. आता सरकार या इशाऱ्याकडे गांभीर्याने पाहणार की पुन्हा एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच जाग येणार, हा खरा प्रश्न आहे.
