Maharashtra Heat Wave : महाराष्ट्रात उष्णतेचा कहर! IMD चा हाय अलर्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. 21 मे २०२६ ।। महाराष्ट्रात सध्या सूर्यदेवाने जणू संतापाचा तवा थेट जनतेच्या डोक्यावर ठेवला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात तापमानाने असा कहर माजवला आहे की रस्त्यावर पाय ठेवतानाही माणूस दोनदा विचार करतो आहे. काही जिल्ह्यांत तापमान ४६ अंशांच्या पुढे गेलं आणि जनजीवन अक्षरशः होरपळून निघालं. भारतीय हवामान विभागाने “गरज असेल तरच घराबाहेर पडा” असा इशारा दिला आहे. म्हणजे परिस्थिती किती गंभीर आहे, याची कल्पना यावरूनच यावी. नागपूर, अकोला, अमरावती आणि वर्धा या भागांत उष्णतेचा तडाखा इतका वाढला आहे की दुपारी रस्ते ओस पडत आहेत. झाडांची सावली शोधणारा माणूस आणि पाण्याचा थेंब शोधणारा पक्षी — दोघांचीही अवस्था सारखीच झाली आहे. उष्माघाताच्या घटनांची भीती वाढत असून, रुग्णालयांतही खबरदारीचे इशारे दिले जाऊ लागले आहेत.

नागपूरमध्ये तापमान ४५.५ अंशांवर पोहोचलं, तर वर्ध्याने सलग दोन दिवस ४६.५ अंश सेल्सिअसचा उच्चांक नोंदवला. ही आकडेवारी वाचताना जरी साधी वाटली, तरी प्रत्यक्षात तिचा अर्थ म्हणजे अंगातून वाहणारा सततचा घाम, घरात बसूनही न मिळणारा आराम आणि रात्रभर न लागणारी झोप! सकाळीच उन्हाचे चटके सुरू होतात आणि दुपारी तर रस्ते जणू भट्टीसारखे तापतात. कामगार, वाहतूक कर्मचारी, शेतमजूर आणि उन्हात काम करणाऱ्या लोकांची अवस्था सर्वाधिक बिकट झाली आहे. लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही उष्णता थेट जीवघेणी ठरू शकते, असा इशारा डॉक्टर देत आहेत. पण प्रश्न असा आहे की, गरीब माणूस उन्हापासून लपणार तरी कुठे? ज्याच्या घरात पंखा चालवायलाही दोनदा विचार करावा लागतो, त्याला हवामान खात्याचे सल्ले कितपत परवडणार?

मुंबईची परिस्थितीही काही वेगळी नाही. तिथे तापमान तुलनेने कमी असलं, तरी दमट हवेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. “हॉट अँड ह्युमिड” या इंग्रजी शब्दांनी हवामान खातं परिस्थिती समजावून सांगतं; पण सामान्य मुंबईकरासाठी त्याचा अर्थ एकच — सतत घाम, चिडचिड आणि अस्वस्थता! समुद्रकिनाऱ्याच्या भागात दमट वारे वाहत असले तरी त्यातून दिलासा कमी आणि त्रास जास्त मिळतो आहे. काही भागांत हलक्या सरींचा अंदाज असला तरी तो उकाड्यावर फुंकर घालण्याइतकाच ठरणार आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून विदर्भात दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी तोपर्यंत महाराष्ट्राला उन्हाच्या या आगीच्या तव्यातच भाजत राहावं लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *