![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ मे २०२६ ।। पुणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना, यंदाचा जयंती सोहळा अधिक भव्य आणि लोकसहभागातून साजरा करण्याची मागणी समाज बांधवांकडून करण्यात आली आहे. दरवर्षी महानगरपालिकेकडून जयंती साजरी केली जाते; मात्र कार्यक्रमांचे नियोजन शेवटच्या क्षणी होत असल्याने अनेक उपक्रम अपूर्ण राहतात, अशी खंत व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पालिकेने तातडीने बैठक घेऊन सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा आणि सामाजिक उपक्रमांचे नियोजन निश्चित करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी जयंती निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे गरजेचे आहे. शहरातील समाज बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतील, अशा पद्धतीने कार्यक्रमांचे नियोजन व्हावे. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, रांगोळी, चित्रकला, निबंध आणि सांस्कृतिक स्पर्धा घेतल्यास जयंतीला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त होईल. मात्र त्यासाठी महापालिकेने नियोजनबद्ध तयारी करून कार्यक्रमांची माहिती वेळेत नागरिकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय स्मारक परिसरातील सुशोभीकरण आणि दुरुस्तीची कामे जयंतीच्या एक-दोन दिवस आधी सुरू केली जातात, त्यामुळे अनेक कामे अपुरी राहतात, असा अनुभव मागील वर्षांत आला असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित विभागांना आधीच सूचना देऊन स्मारकासंदर्भातील सर्व कामे जयंतीपूर्व दोन ते तीन दिवसांत पूर्ण करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. “अखेरच्या क्षणी गडबड करून नव्हे, तर नियोजनपूर्वक आणि सन्मानाने जयंती साजरी व्हावी,” अशी भावना समाज बांधवांनी व्यक्त केली असून, महापालिका प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
