‘अशी ही बनवाबनवी’चा रिमेक विषयी काय म्हणतात ; महागुरू सचिन पिळगावकर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. २३ सप्टेंबर – काही चित्रपट अनेक वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या मनाच्या कप्प्यात तसेच राहतात. त्यातील कलाकार, संवाद, गाणी यांची वर्षानुवर्षे चर्चा होतच असते. असाच एक मराठी चित्रपट म्हणजे ‘अशी ही बनवाबनवी’. हा चित्रपट अनेकदा पाहिला तरी मन भरत नाही आणि कंटाळाही येत नाही. सध्या जुने चित्रपट पुन्हा एकदा नव्या अंदाजात रिमेक बनवून प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा ट्रेण्ड आहे. त्यामुळे या लोकप्रिय ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटाचाही रिमेक बनवणार का असा प्रश्न एका चाहत्याने सचिन पिळगावकर यांना विचारला.

”फक्त मराठी फेसबुक लाइव्ह’द्वारे सचिन पिळगावकर चाहत्यांशी संवाद साधत होते. त्यावेळी एका चाहत्याने त्यांना हा प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, “अशी ही बनवाबनवीचा रिमेक नाही बनू शकत. कारण आपण ‘लेजंड्स’ गोष्टींना हात लावू नये. आगीशी कधीच खेळू नये. कारण मग त्याची तुलना केली जाईल आणि मग मलाच शिव्या खावे लागणार. ते कशाला करायचं. त्यापेक्षा जे आहे ते राहू द्यायचं. ताजमहाल संगमरवरी दगडांनी बनवलेला आहे. त्याला एखादी जरी विट लागली तर त्याचं सौंदर्य निघून जाणार. त्यामुळे अशी ही बनवाबनवी ज्या काळात बनला, ती वेळ, परफेक्ट कास्टिंग, लेखक वसंतराव सबनीस आणि प्रत्येक गोष्टीची भट्टी जमली. म्हणूनच इतक्या वर्षांनंतरही हा चित्रपट आवडीने पाहिला जातो. हिंदीतही अनेकांनी रिमेक बनवण्याचा प्रयत्न केला. पण ते तोंडावर आपटले. त्यामुळे आपण रिमेक बनवू नये असं मला वाटतं.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *