महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. २३ सप्टेंबर -कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीमध्ये नफावसुली जोरात सुरु आहे. त्यामुळे या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४३१ रुपयांनी कमी झाला आहे. त्याने ५० हजारांची पातळी तोडली आहे. सोने सध्या ४९९५० रुपयांवर ट्रेड करत आहे. सोने ५० हजारांखाली आल्याने खरेदीसाठी वाट पाहणाऱ्या ग्राहकांना आता संधी निर्माण झाल्याचे बोलले जाते.
आज सकाळी कमॉडिटी बाजार उघडल्यानंतर सोने आणि चांदीमध्ये नफावसुली दिसून आली. गेले दोन दिवस बाजारात चांदीची जोरदार विक्री सुरु असून भाव गडगडला आहे. सोन्याबरोबरच चांदीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. करोना संकट आणि बाजारातील मागणी कमी झाल्याने सोने आणि चांदीचे सौदे गडगडले असल्याचे जाणकार सांगतात. सध्या कमॉडिटी एक्सचेंजवर चांदी भाव १९१३ रुपयांनी कमी झाला आहे. एक किलो चांदीचा दर ५९३०० रुपये झाला आहे. सोन्यावर ३ टक्के वस्तू आणि सेवा कर तसेच घडणावळ मजुरी आकारली जाते. त्यामुळे प्रत्यक्ष बाजारात सोन्याच्या किंमतीत ४ ते ५ हजारांची वाढ होते.
goodreturns या वेबसाईटनुसार बुधवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९६४० रुपये आहे. तर २४ कॅरेटसाठी तो ५०६४० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९५१० रुपये आहे. तर २४ कॅरेटसाठी तो ५४०१० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९७५० रुपये आहे. तर २४ कॅरेटसाठी तो ५२४५० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८८१० रुपये आहे. तर २४ कॅरेटसाठी तो ५३२४० रुपये आहे.
मंगळवारी मल्टी कमाॅडिटी एक्सचेंजवर (MCX) संध्याकाळी ४ वाजता चांदीच्या दरात किलोमागे ९०० रुपयांची घसरण झाली होती. चांदीचा भाव एक किलोला ६०४०० रुपयांपर्यंत खाली आला होता. याआधी सोमवारी चांदीच्या किमती तब्बल ६३०० रुपयांची घसरण झाली. औद्योगिक मागणी कमी झाल्याने कमॉडिटी बाजारात ट्रेडर्सने चांदीची विक्री करणे पसंत केले. सोमवारी चांदीचा भाव ९.३ टक्क्यांनी कमी झाला होता.