कोरोना सोबतचे जग – भाग ३ -प्रतिज्ञा पवार शेटे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – प्रतिज्ञा पवार शेटे- पुणे – दि. २३ सप्टेंबर -कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने जनता कर्फ्यू नंतर कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक लॉकडाऊन जाहीर केले. यानंतर देशात महानगरांमध्ये काम करणाऱ्या आणि हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे, कामगारांचे झालेले हाल आणि रोजरांसंबंधीची आजची स्थिती याचा थोडक्यात आढावा आज घेणार आहोत. लॉकडाऊननंतर सर्व रोजगार अचानक थांबल्यामुळे रोज किंवा आठवड्याला मिळणारी कमाई बंद झाली. याही परिस्थितीत ८ ते १० दिवस काढल्यानंतर मजूर, कामगारांच्या संयमाचा बांध फुटला…

नुकतेच केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय लोकसभेत म्हणाले होते की, लॉकडाऊननंतर फेक न्यूजला ऊत आला आणि या फेकन्यूजमुळे निर्माण झालेल्या भीतीमुळे हजारो मजूर आपल्या घराकडे पायी रवाना झाले. लॉकडाउननंतर हजारो स्थलांतरित मजूर पायीच आपापल्या घरी रवाना झाले होते. यामागचं कारण काय? असा प्रश्न तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार माला रॉय यांनी विचारला होता. त्यावर उत्तर देताना नित्यानंद राय यांनी हे वक्तव्य केलं.लॉकडाऊनच्या कालावधीसंबंधी ज्या फेक न्यूज पसरल्या त्यातून निर्माण झालेल्या भीतीमुळे मोठ्या संख्येने प्रवासी मजुरांचं पलायन सुरू झालं. शिवाय लोकांना विशेषतः प्रवासी मजुरांना अन्न, पिण्याचं पाणी, आरोग्य सुविधा आणि निवारा यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण होतील की नाही, याची काळजी लागून होती, असा दावा केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी केला.

त्याचबरोबर अपरिहार्य लॉकडाऊनच्या काळात कुणीही अन्न, पिण्याचं पाणी, आरोग्य सुविधा यासारख्या मूलभूत गरजांपासून वंचित राहू नये, यासाठी केंद्र सरकार सजग होतं आणि या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक पावलंही उचलली होती से निरीक्षण मंत्री महोदयांनी नोंदवले. मात्र, प्रत्यक्षात भारतात लॉकडाऊनच्या काही दिवस आधीपासूनच मजुरांचं स्थलांतर सुरू झालं होतं. पुढे अनेक महिने हे स्थलांतर सुरू होतं. लॉकडाऊनपूर्वी रस्त्यांवर अगदी दोन-चार मजूर आपलं सामान आणि मुलबाळं घेऊन जाताना दिसायचे. मात्र, लॉकडाऊननंतर महामार्ग असो की आतले रस्ते, इतकंच नाही तर रेल्वे ट्रॅकवरूनसुद्धा हजारो मजूर पायीच आपापल्या राज्यात परतत असताना दिसले. रेल्वे ट्रॅकवर १५ हुन जास्त मजुरांचा बळी गेला. जून आणि जुलै महिना उलटल्यानतंरही अनेक लोक ट्रक किंवा अशाच इतर मोठ्या वाहनांमध्ये अमानवीय पद्धतीने प्रवास करत असल्याचं दिसत होतं.

प्रत्यक्षात काय झाला असा प्रश्न जेव्हा महाराष्ट्र २४ ने उत्तर प्रदेशहून परत पुण्यात परतलेल्या एका कामगाराच्या पत्नीला विचारला तेव्हा तिने सांगितले कि माझ्या खोलीत खायला काहीच शिल्लक नव्हतॆ. तीन दिवस आम्ही साखरेचं पाणी करून प्यायलो. डाळ-तांदुळ काहीच नव्हते. माझं गॅस सिलेंडरही संपलं होतं. मग आम्ही 100 नंबरवर कॉल केला. त्यांनी जो हेल्पलाईन नंबर सुरू केला होता त्यावर कॉल केला. ते म्हणाले की आम्ही जेवण घेऊन येतोय.आम्ही ठिक आहे म्हटलं. त्यानंतर धान्य तर मिळालं नाहीच. पण सात नंबर गल्लीत तयार करण्यात आलेलं जेवण घेऊन आले होते. आम्ही जेवायला जात असताना पोलिसांनी माझ्या नवऱ्याला काठी मारून पाडलं. म्हणजे जेवायलाही जाऊ दिलं नाही. कसेतरी तीन दिवस काढले. त्यानंतर परिस्थिती इतकी वाईट झाली होती की काय सांगायचं. मग घरी परत जाण्यासाठी पोलीस ठाण्यात आधार कार्ड आणि पत्ता वगैरे दिला. मात्र, मोबाईलवर कुठलाच कॉल किंवा मेसेज आला नाही. मेसेज येत नव्हता.

जेवायला खोलीत काहीच नव्हतं. घरमालकही भाडं मागत होता. मग ठरवलं की काही झालं नाही तर पायीच घरी जाऊ. बरंच लांब पायी चाललो. यादरम्यान म्युनिसिपल शाळांच्या वर्गांमध्ये या स्थलांतरित प्रवाशांची सोय प्रशासनकडून करण्यात येत होती. तसेच प्रत्यि जात असताना अनेकदा स्थानिक रहिवाशांनी मदत केल्याचे पूजा कुमारी सांगतात. त्यानंतर पूजा कुमारी आणि त्यांचे पती त्यावेळी सुरू करण्यात आलेल्या स्पेशल ट्रेनने अनेक अडचणी पार करत झारखंडच्या आपल्या घरी परतले.या कहाण्या काही मोजक्या प्रवाशी मजुरांच्या आहेत जे हातातलं काम सुटल्यामुळे आणि अन्न-पाणीही नसल्याने आपापल्या गावी परतले होते. मात्र, असेही काही मजूर आहेत ज्यांना पायी गावी परतून गावातही काम मिळालं नाही. शेवटी त्यांनी पुन्हा एकदा दिल्ली-मुंबई सारख्या महानगरांची वाट धरली. कोरोनाचा धोका कायम असूनही नियम शिथिल झाल्यामुळे अनेक परराज्यातील कुटुंबं पुण्यात परतत आहेत. शेवटी सरकारी घोषणा, मदत हि प्रत्यक्षात कमी आणीन कागदावर जास्त रहात असल्याने या परिस्थितीचा मुकाबला करण्यावाचून जनतेला पर्यायच नाहीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *