![]()
डॉलर घसरला, युद्धाचे ढग दाटले; सराफा बाजारात पुन्हा अस्थिरतेची धडकी
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ मे २०२६ ।। Gold Price Today :सराफा बाजार म्हणजे आता एखाद्या युद्धभूमीपेक्षा कमी राहिलेला नाही. सकाळी तेजी, दुपारी मंदी आणि संध्याकाळी पुन्हा उसळी… गुंतवणूकदारांचे हृदयाचे ठोके वाढवणारा हा खेळ गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू आहे. बुधवारी सकाळी बाजार उघडताच सोन्याने पुन्हा चमक दाखवली, तर चांदीने थेट उंच झेप घेत गुंतवणूकदारांना चकित केले. डॉलर कमकुवत होत असताना आणि मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती अधिक धोकादायक बनताना, सुरक्षित गुंतवणुकीकडे लोकांचा ओढा वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे. परिणामी एमसीएक्स बाजारात सोनं आणि चांदी दोन्हीने पुन्हा तेजीत प्रवेश केला आहे.
बुधवारी सकाळी ९.३२ वाजेपर्यंत एमसीएक्सवर सोन्याचा जुलै वायदा १,५७,५११ रुपयांच्या आसपास व्यवहार करत होता. दुसरीकडे चांदीने मात्र जबरदस्त उसळी घेत तब्बल १३०० रुपयांची वाढ नोंदवली आणि दर थेट २,७१,८२३ रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले. काही दिवसांपूर्वी घसरणीच्या गर्तेत गेलेल्या चांदीने अचानक घेतलेली ही झेप बाजारासाठी धक्कादायक ठरली आहे. डॉलर इंडेक्समधील कमकुवतपणा आणि तेलाच्या किमतींमध्ये झालेली घसरण यामुळे मौल्यवान धातूंना आधार मिळाला. मात्र गुंतवणूकदार अजूनही पूर्णपणे निर्धास्त नाहीत. कारण अमेरिका-इराण शांतता कराराबाबतचा संभ्रम अजून कायम आहे आणि त्याचे परिणाम थेट जागतिक बाजारावर उमटताना दिसत आहेत.
दरम्यान, इस्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये केलेल्या ताज्या हल्ल्यांमुळे तणाव पुन्हा भडकला आहे. अल जझीराच्या अहवालानुसार या हल्ल्यांत ३१ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत. युद्धविरामाच्या चर्चा सुरू असल्या तरी प्रत्यक्षात बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांचे आवाज थांबलेले नाहीत. अशा अस्थिर वातावरणात गुंतवणूकदार पुन्हा सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे धावत आहेत. मात्र एकीकडे तेलाच्या वाढत्या किमतींमुळे महागाई वाढण्याची भीती आहे. महागाई वाढली तर व्याजदर वाढतील आणि व्याजदर वाढले की सोन्यावर दबाव येतो. त्यामुळे सराफा बाजारात सध्या आशा आणि भीती यांचा विचित्र संघर्ष सुरू असल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे २८ फेब्रुवारीपासून अमेरिका-इराण संघर्षाला सुरुवात झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतींमध्ये जवळपास १५ टक्क्यांची घसरण झाली होती. पण आता पुन्हा परिस्थिती पलटताना दिसत आहे. डॉलर कमकुवत होतोय, युद्धाचे ढग अधिक गडद होत आहेत आणि जागतिक अर्थव्यवस्था अनिश्चिततेच्या भोवऱ्यात अडकत चालली आहे. अशा वेळी सर्वसामान्य नागरिकांसाठी सोनं-चांदी खरेदी करणं अधिक कठीण होणार, हे स्पष्ट आहे. महागाईच्या ज्वाळांनी आधीच पेट्रोल, डिझेल आणि गॅस महाग केला असताना आता सराफा बाजारही सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागल्याची भावना निर्माण झाली आहे.
