FIFA 2026 Smart Football Trionda AI Technology Features | चार्जिंगवर चालणारा चेंडू, फुटबॉलचे बदलले भविष्य!

Spread the love

Loading

फिफा विश्वचषकातील ‘ट्रिओन्डा’ ठरणार AI युगाचा नवा गोलकिंग; मैदानावर निर्णय देणार आता स्वतः फुटबॉलच!

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ जून २०२६ ।। फुटबॉल म्हणजे एक चेंडू, बावीस खेळाडू आणि गोलपोस्टकडे धावणारे स्वप्न! पण आता या खेळात असा काळ आला आहे की, चेंडू फक्त लाथा खाणार नाही तर स्वतः माहिती देणार, निर्णय प्रक्रियेत सहभागी होणार आणि पंचांनाही मदत करणार आहे. २०२६ च्या फिफा विश्वचषकासाठी सादर करण्यात आलेला ‘ट्रिओन्डा’ हा फुटबॉल पाहिला तर तो चेंडूपेक्षा एखाद्या अंतराळ मोहिमेतील उपकरणासारखा वाटतो. शतकभरापासून खेळाच्या केंद्रस्थानी असलेला फुटबॉल आता कृत्रिम बुद्धिमत्ता, सेन्सर विज्ञान आणि डेटा विश्लेषणाच्या नव्या युगात प्रवेश करत आहे. त्यामुळे यंदाच्या विश्वचषकात मैदानावर फक्त खेळाडूंचीच नव्हे, तर चेंडूचीही ‘बुद्धिमत्ता’ चर्चेचा विषय ठरणार आहे.

फुटबॉलच्या इतिहासात प्रथमच असा चेंडू वापरला जाणार आहे, ज्याला खेळण्यापूर्वी चार्ज करावे लागते. तब्बल ९० मिनिटे चार्ज केल्यानंतर हा ट्रिओन्डा सहा तास कार्यरत राहतो. कारण त्याच्या आत बसवण्यात आलेली अत्याधुनिक IMU सेन्सर प्रणाली प्रत्येक सेकंदाला ५०० वेळा डेटा गोळा करते. खेळाडूने चेंडूला कधी स्पर्श केला, किती ताकदीने मारला, कोणत्या दिशेने फिरवला आणि तो हवेत कसा प्रवास करतो याची अचूक नोंद हा फुटबॉल ठेवतो. कालपर्यंत रेफरी आणि VAR कॅमेरे निर्णय घेत होते; आता त्या निर्णय प्रक्रियेत स्वतः चेंडूही सहभागी होणार आहे. त्यामुळे ‘बॉल इज इन युवर कोर्ट’ ही म्हण बदलून ‘बॉल इज रिपोर्टिंग फ्रॉम द कोर्ट’ अशी म्हणावी लागेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

ट्रिओन्डाची रचनाही तितकीच क्रांतिकारक आहे. फुटबॉलच्या इतिहासात प्रथमच अवघ्या चार पॅनेल्सचा वापर करून हा चेंडू तयार करण्यात आला आहे. त्यामुळे हवेत त्याचा प्रवास अधिक स्थिर राहतो आणि दिशा अनपेक्षितपणे बदलत नाही. २०१० च्या जाबुलानी चेंडूवर खेळाडूंनी व्यक्त केलेल्या नाराजीचा धडा लक्षात घेऊन ट्रिओन्डाची निर्मिती करण्यात आली आहे. वैज्ञानिक संशोधनानुसार हा चेंडू अधिक नियंत्रित, अचूक आणि एरोडायनॅमिकदृष्ट्या सक्षम आहे. म्हणजे गोलरक्षकांना अचानक धक्का देणारा नव्हे, तर विज्ञानाच्या नियमांनुसार वागणारा हा फुटबॉल ठरणार आहे. आधुनिक अभियांत्रिकी आणि क्रीडा विज्ञानाचा हा संगम पाहून अनेक तज्ज्ञांनी त्याला ‘स्मार्ट बॉल’ची नवी व्याख्या दिली आहे.

विशेष म्हणजे, अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या तीन यजमान देशांच्या प्रतीकांनी सजलेला ट्रिओन्डा हा केवळ फुटबॉल नसून तंत्रज्ञानाच्या नव्या पर्वाचा दूत बनला आहे. मेपल लीफ, गरुड आणि स्टार या प्रतीकांतून तीन देशांची एकात्मता दाखवण्यात आली आहे. ४८ संघांच्या ऐतिहासिक विश्वचषकात जेव्हा पहिली किक ट्रिओन्डाला बसणार आहे, तेव्हा मैदानावर फक्त खेळ सुरू होणार नाही; तर कृत्रिम बुद्धिमत्ता, सेन्सर विज्ञान आणि डिजिटल विश्लेषणाची नवी क्रांतीही धावू लागणार आहे. फुटबॉलच्या दीडशे वर्षांच्या इतिहासात प्रथमच चेंडू स्वतः बोलणार आहे, आणि कदाचित भविष्यात खेळाचे नियमही बदलणार आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *