पाच रुपयांच्या कचोरीवर धाड; शेगाव हादरलं!

Spread the love

Loading

गरिबांच्या पोटाचा आधार ठरलेली कचोरी तपासणीच्या फेऱ्यात; छाप्यामागचं कारण काय आणि शेगाव कचोरीचा थक्क करणारा इतिहास काय?

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ जून २०२६ ।। शेगाव म्हटलं की डोळ्यासमोर दोनच गोष्टी उभ्या राहतात—श्री संत गजानन महाराजांचं पवित्र स्थान आणि तोंडाला पाणी सुटावं अशी झणझणीत कचोरी! अवघ्या पाच रुपयांत पोटाची खळगी भरणारी ही कचोरी अनेकांसाठी फक्त खाद्यपदार्थ नाही, तर भावनांचा विषय आहे. त्यामुळेच गुरुवारी अन्न व औषध प्रशासनाने शेगावच्या प्रसिद्ध कचोरी सेंटरवर अचानक छापा टाकल्याची बातमी समोर येताच विदर्भभर खळबळ उडाली. तुकाराम मुंडे यांच्या आदेशानंतर राज्यभर भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात मोहीम सुरू असून त्याचाच भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली. निरीक्षक गुलाबसिंग वसावे यांच्या पथकाने कचोरी बनवण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आणि विविध नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले. अहवालात भेसळ आढळल्यास कठोर कारवाई होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे “कचोरीच्या राजधानीत” अचानक तपासणीचे वारे वाहू लागले आहेत.

मात्र या कारवाईपेक्षा अधिक उत्सुकता एका प्रश्नाची आहे—शेगाव कचोरी इतकी प्रसिद्ध झाली तरी कशी? तिची सुरुवात नेमकी कुठून झाली? याची कहाणी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी रंजक नाही. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर पंजाबमधील तिरथराम शर्मा उदरनिर्वाहासाठी दिल्लीत कचोरी विकत होते. त्याच काळात रेल्वे कॅन्टीनची टेंडर प्रक्रिया सुरू झाली आणि त्यांनी शेगाव रेल्वे स्थानकाच्या कॅन्टीनसाठी अर्ज केला. नशीबाने साथ दिली आणि १९५० च्या सुमारास त्यांना हे काम मिळाले. रेल्वे प्रवाशांसाठी तयार केलेली झणझणीत कचोरी काही दिवसांतच लोकप्रिय झाली. तिची चव इतकी वेगळी होती की, लोकांनी तिला थेट “शेगाव कचोरी” हे नावच बहाल केले.

गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांनी या कचोरीची कीर्ती गावाबाहेर नेली. शर्मा यांनी काळानुसार तिच्यात बदल केले. मुगाच्या डाळीऐवजी बेसनाचा वापर, विदर्भाच्या चवीला साजेसा मसाला आणि खुसखुशीत पोत यामुळे कचोरीची लोकप्रियता आकाशाला भिडली. शेगावला येणारा भाविक प्रसादासोबत कचोरीचं पार्सल घेऊन जाऊ लागला. पुढे महाराष्ट्र, देश आणि परदेशापर्यंत तिची चव पोहोचली. इतकंच नव्हे तर परदेशी ग्राहकांसाठी ‘फ्रोझन कचोरी’ची संकल्पनाही आली. बाहेर पाच दिवस आणि फ्रिजमध्ये पंधरा ते वीस दिवस टिकणारी ही कचोरी आता जागतिक पातळीवर पोहोचली आहे.

आज तिरथराम शर्मा यांच्या पुढील पिढ्या हा वारसा जपत आहेत. अनेक बदल झाले, दुकानं वाढली, ग्राहक वाढले; पण कचोरीची चव मात्र तशीच राहिली. या चवीचं खरं रहस्य तिच्या मसाल्यात दडलं आहे. पाच मुलांकडून सोळा नातवंडांपर्यंत पोहोचलेली ही रेसिपी आजही घराबाहेर गेलेली नाही. म्हणूनच शेगाव कचोरी हा केवळ खाद्यपदार्थ नाही, तर एक परंपरा आहे. आता प्रशासनाच्या तपासणीत सर्व काही सुरळीत आढळल्यास ही परंपरा आणखी बळकट होईल; पण या धाडीमुळे एक गोष्ट निश्चित झाली—पाच रुपयांची कचोरी असली तरी तिची कीर्ती आणि किंमत लाखमोलाची आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *