![]()
मिसिंग लिंकवरील दरडीचा फटका; मुंबई–पुणे शिवनेरी पुढील आदेशापर्यंत बंद, दोन दिवसांत राज्यभर ७,८२० एसटी फेऱ्या रद्द
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०७ जुलै २०२६ ।। मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर कोसळलेल्या एका दरडीने केवळ रस्ता अडवला नाही, तर हजारो प्रवाशांच्या नियोजनालाही ब्रेक लावला. चार तासांत पुणे–मुंबई गाठण्याचा विश्वास देणारी शिवनेरी अखेर निसर्गाच्या प्रकोपासमोर थांबली. मिसिंग लिंकवरील दरड हटेपर्यंत आणि मार्ग पूर्णपणे सुरक्षित होईपर्यंत शिवनेरीच्या सर्व फेऱ्या पुढील आदेशापर्यंत रद्द करण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाला घ्यावा लागला. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा निर्णय योग्य असला, तरी पावसाने वाहतुकीच्या व्यवस्थेचे किती कंबरडे मोडले आहे, याचे हे सर्वात ठळक उदाहरण ठरले आहे. महामार्गावर दगड कोसळले आणि प्रवाशांच्या वेळेवर, पैशावर आणि संयमावरही संकट कोसळले.
मुंबई–पुणे मार्गावर धावणारी वातानुकूलित शिवनेरी ही एसटीची प्रतिष्ठेची सेवा मानली जाते. साध्या बसपेक्षा अधिक भाडे मोजूनही हजारो प्रवासी वेळेच्या अचूकतेसाठी या सेवेवर विश्वास ठेवतात. मात्र मुसळधार पावसाने मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळल्याने संपूर्ण वाहतूक ठप्प झाली. सोमवारी सकाळी दादरहून निघालेली शिवनेरी पुण्याकडे रवाना झाली खरी, पण त्यानंतर एकही बस मार्गावर जाऊ शकली नाही. पुण्याहून सकाळी सात वाजता सुटलेली बस दादरला पोहोचण्यासाठी तब्बल आठ तास लागले. चार तासांचा प्रवास दुप्पट वेळेत पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखत सर्व फेऱ्या तात्पुरत्या स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
अतिवृष्टीचा फटका केवळ शिवनेरीपुरता मर्यादित राहिलेला नाही. राज्यभरात गेल्या दोन दिवसांत तब्बल ७,८२० एसटी फेऱ्या रद्द झाल्याने हजारो प्रवाशांचे नियोजन कोलमडले आहे. रायगड विभागातील महाड, अलिबाग, पेण, श्रीवर्धन, कर्जत, रोहा, मुरुड आणि माणगाव आगारांतील ७३७ फेऱ्या, तर रत्नागिरी विभागातील दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, देवरुख, रत्नागिरी, लांजा, राजापूर आणि मंडणगड येथील ६८० फेऱ्या रद्द करण्यात आल्या. घाटरस्ते, पूल आणि महामार्ग धोकादायक बनल्याने प्रशासनाने प्रवाशांच्या जीविताला प्राधान्य दिले. पावसाचा प्रत्येक जोरदार मारा आता वाहतुकीसाठी नवा अडथळा निर्माण करत असून, एसटीचे चाक अक्षरशः निसर्गाच्या मर्जीत अडकले आहे.
दरम्यान, महामंडळात दुसऱ्याच कारणाने अस्वस्थता वाढली आहे. नाशिकसह विविध विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर झालेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे चालक, वाहक आणि अधिकारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आगार व्यवस्थापकांच्या कार्यक्षेत्रातील त्रुटींसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई होत असल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये पसरली आहे. यापूर्वी रायगड, सातारा, जळगाव आणि कणकवली येथेही अशाच कारवाया झाल्याने कर्मचारी वर्ग अस्वस्थ झाला आहे. बहुजन परिवहन अधिकारी–कर्मचारी संघटनेने परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे कारवाई मागे घेण्याची मागणी केली आहे. एका बाजूला निसर्गाची परीक्षा आणि दुसऱ्या बाजूला प्रशासनातील धास्ती अशा दुहेरी संकटात एसटी यंत्रणा सापडली असून, प्रवाशांनी अधिकृत सूचनांनुसारच प्रवासाचे नियोजन करावे, हाच सध्या सर्वात सुरक्षित पर्याय ठरत आहे.