४,८०० कर्मचाऱ्यांची कपात; एआय नव्हे तर वाढता खर्च आणि गेमिंग व्यवसायातील तोट्यामुळे कठोर निर्णय
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०७ जुलै २०२६ ।। Microsoft Layoffs Marathi News : तंत्रज्ञानाच्या दुनियेत कालपर्यंत इतर कंपन्यांना व्यवस्थापनाचे धडे देणाऱ्या मायक्रोसॉफ्टलाच आता स्वतःच्या हिशेबाची वही उघडावी लागली आहे. अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक, एआयच्या नावावर प्रचंड खर्च आणि अपेक्षेप्रमाणे न मिळालेला आर्थिक परतावा यामुळे कंपनीने तब्बल ४,८०० कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक कर्मचारी कपातीमागे कृत्रिम बुद्धिमत्तेलाच दोष देण्याची फॅशन सुरू असताना मायक्रोसॉफ्टने मात्र स्पष्ट शब्दांत सांगितले की, या निर्णयामागे एआय नाही, तर आर्थिक पुनर्रचना आणि वाढलेला खर्च हेच खरे कारण आहे. मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या तंत्रज्ञान क्षेत्रालाही शेवटी नफ्याच्या आकड्यांसमोर नतमस्तक व्हावे लागते, हे या निर्णयाने पुन्हा सिद्ध झाले.
२०२६ च्या पहिल्या सहामाहीत मायक्रोसॉफ्टच्या शेअर्समध्ये २३ टक्क्यांची घसरण झाली असून, २०१२ नंतरची ही सर्वात निराशाजनक कामगिरी मानली जात आहे. दुसरीकडे, डेटा सेंटर आणि एआय पायाभूत सुविधांसाठी कंपनीने तब्बल १९० अब्ज डॉलर्स खर्च करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जागतिक तंत्रज्ञान उद्योगात यंदा एआय इन्फ्रास्ट्रक्चरवर ७०० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक खर्च होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. एवढ्या प्रचंड गुंतवणुकीचा ताण रोख प्रवाहावर येताच खर्च कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणून कर्मचारी कपात निवडण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे.
या निर्णयाचा सर्वाधिक फटका मायक्रोसॉफ्टच्या एक्सबॉक्स गेमिंग विभागाला बसला आहे. अब्जावधी डॉलर्स मोजून अॅक्टिव्हिजन ब्लिझार्ड आणि झेनीमॅक्स मीडिया यांसारख्या कंपन्या विकत घेतल्यानंतरही अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. उलट गेमर्सची संख्या आणि त्यांचा स्क्रीन टाइम कमी होत गेला. प्लॅटफॉर्म टीम ४० टक्क्यांनी वाढली; पण व्यवसाय त्याच वेगाने वाढला नाही. आकडे सांगतात की, गेमिंग स्टुडिओंमध्ये गुंतवलेल्या प्रत्येक १ डॉलरमागे कंपनीला सरासरी ६४ सेंट्सचे नुकसान सहन करावे लागत होते. त्यात मेमरी चिप्स महागल्याने एक्सबॉक्सच्या किमती वाढल्या आणि ग्राहकांनीही पाठ फिरवली.
मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनीही परिस्थिती लपवण्याचा प्रयत्न केला नाही. गेमिंग व्यवसाय अधिक शाश्वत आणि नफ्यात आणण्यासाठी पुनर्रचना आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आज अनेक गेमिंग स्ट्रीमर यूट्यूबसारख्या माध्यमांतून मायक्रोसॉफ्टपेक्षा अधिक कमाई करत असल्याची वस्तुस्थिती त्यांनी अधोरेखित केली. ही कर्मचारी कपात केवळ एका कंपनीचा निर्णय नाही; तर तंत्रज्ञान उद्योगाला वाढत्या खर्च, गुंतवणुकीचा दबाव आणि नफ्याच्या कठोर वास्तवाने दिलेला इशारा आहे. चमकदार तंत्रज्ञानाच्या पडद्यामागे आर्थिक गणित चुकले, तर हजारो कर्मचाऱ्यांच्या आयुष्यावर एका निर्णयाची कुऱ्हाड कशी कोसळते, याचे हे ताजे उदाहरण ठरले आहे.