गोदावरीचा रौद्रावतार; नाशिकमध्ये धास्ती वाढली

Spread the love

Loading

मुसळधार पावसाने नदी दुथडी भरून वाहिली; रात्री शंभर नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर, प्रशासन अलर्टवर

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ जुलै २०२६ ।। नाशिक जिल्ह्यात सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केले असून, गोदावरी नदीने आता रौद्ररूप धारण केले आहे. हवामान विभागाने पुढील २४ तासांत ढगफुटीसदृश पावसाचा इशारा दिल्याने प्रशासनाची धावपळ आणखी वाढली आहे. गोदावरीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे नदीकाठावरील अनेक लहान मंदिरे पाण्याखाली गेली असून, गंगापूरसह विविध धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. धरणांमधून विसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज झाली आहे.

रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या प्रवाहात मोठी वाढ झाली आहे. त्र्यंबकेश्वर आणि नाशिक शहर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीपात्र वेगाने भरू लागले आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर पाणी जमा होत असल्याने आवश्यकतेनुसार धरणाचे दरवाजे उघडून विसर्ग वाढविण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास नदीपात्रातील पाणी आणखी वाढू शकते, त्यामुळे नागरिकांनी नदीकाठ, घाट परिसर आणि सखल भागात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, नांदूर-मधमेश्वर धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरूच असून दोन वक्राकार दरवाज्यांमधून सुमारे ३,२२८ क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर निफाड तालुक्यातील सायखेडा, चांदोरी, करंजगाव आणि शिंगवेसह गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये प्रशासनाने विशेष सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. महसूल, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी गावागावात जाऊन परिस्थितीचा आढावा घेत असून नागरिकांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले जात आहे.

परिस्थितीची तीव्रता लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरीसह काही तालुक्यांमध्ये रेड अलर्ट लागू करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या बचाव मोहिमेदरम्यान त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मेटघर गावातील २७ कुटुंबांतील सुमारे १०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्हाभरातील बचाव पथके सतत गस्त घालत असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *