![]()
नागपुरातील प्रसिद्ध स्वीट्स आस्थापन्याचा परवाना तात्पुरता निलंबित; अन्न सुरक्षेबाबत प्रशासनाचा कडक इशारा
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ जुलै २०२६ ।। राज्यात अन्न सुरक्षेबाबत सुरू असलेल्या धडक मोहिमेने आता वेग घेतला असून, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी निष्काळजी व्यावसायिकांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. नागपुरातील पाचपावली परिसरातील ‘श्री हिरा स्वीट’ या प्रसिद्ध आस्थापन्यावर करण्यात आलेल्या तपासणीत उत्पादन विभागातील किचनमध्ये मृत उंदीर आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासनाने थेट परवाना तात्पुरता निलंबित केला आहे. यासोबतच उत्पादन युनिट तात्काळ बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे राज्यभरातील अन्न व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
३ जुलै रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या उत्पादन केंद्राची सखोल तपासणी केली. तपासणीदरम्यान केवळ मृत उंदीरच नव्हे, तर स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आणि उत्पादन प्रक्रियेतील अनेक त्रुटीही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्या. अन्न तयार होणाऱ्या ठिकाणी अशी परिस्थिती आढळणे हे ग्राहकांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही आस्थापनाला यापुढे मोकळे रान दिले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अजय सदार यांनी सांगितले की, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यभर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, स्वीट्स उत्पादक, दूध डेअरी, दूध संकलन केंद्रे आणि इतर अन्न व्यवसायिकांची सखोल तपासणी सुरू आहे. नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न मिळणे ही प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी असून, सार्वजनिक आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक अन्न व्यवसायिकाने अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, श्री हिरा स्वीटचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेला नसून तो तात्पुरता निलंबित करण्यात आला आहे. संबंधित आस्थापन्याने सर्व त्रुटी दूर करून स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि उत्पादन प्रक्रियेत आवश्यक सुधारणा केल्यानंतर प्रशासन पुन्हा तपासणी करणार आहे. तपासणीचा अहवाल समाधानकारक आढळल्यास तो आयुक्तांकडे सादर केला जाईल आणि त्यानंतरच परवाना पुन्हा सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. ग्राहकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा कडक इशारा अन्न व औषध प्रशासनाने पुन्हा एकदा दिला असून, राज्यभर सुरू असलेली ही धडक मोहीम आगामी काळात आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.